अंजाळे गावातील पोलिस चौकी उरली नावालाच

0

अप्रिय घटनेची भीती ; वरीष्ठ अधिकार्‍यांनी दखल घेण्याची गरज

यावल- तालुक्यातील यावल-भुसावळ मार्गावरील अंजाळे गावाजवळील घाटावर नागरी सुरक्षेसाठी उभारण्यात आलेली पोलीस चौकी दारूडे व आंबट शौकीनांच्या पथ्थ्यावर पडली आहे. पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे असून चौकीच्या गैरवापरामुळे प्रसंगी काही अप्रिय घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.

चौकी ठरतेय दारूड्यांसह प्रेमविरांचा अड्डा
यावल-भुसावळ या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. हे लक्षात ठेवून काही परप्रांतीय रस्तालूट करणारे चोरटे नेहमीच मार्गावर असतात. या दृष्टीकोणातुन तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण साळुंखे यांनी नागरीकांच्या सुरक्षेला प्रधान्य देवून अंजाळे गावाजवळच्या घाटावर पोलिस चौकी उभारली. काही दिवस या पोलिस चौकीवर पोलिसांचा नियमीत बंदोबस्त राहत होता मात्र काही दिवसांनी कर्मचारी संख्येअभावी किंवा काही कारणाने पोलिसांचा बंदोबस्त या अंजाळे घाटाच्या पोलिस चौकीवरून काढून घेण्यात आला. यामुळे ही पोलिस चौकी प्रशासनाकडून दुर्लक्षित झाल्याने परीसरातील व शहरातील प्रेम विरांचा व काही आंबटशौकीनांचा मोर्चा रात्रीच्या वेळी निर्मनुष्य राहत असलेल्या पोलिस चौकीकडे वळाला आहे. ही बाब वरीष्ठ पातळीवरून गांभीर्याने घ्यावी तसेच पोलिस चौकीची तुटलेली दारे व खिडक्या दुरुस्त करून विद्युत पुरवठा पुर्वरत सुरू करून ही पोलिस चौकी नागरीकांच्या सुरक्षा सेवेसाठी पोलिस कर्मचारी यांची नियमीत या पाँईटवर नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.