अंजाळे गावातील 30 हजार रुपये किंमतीची बैलजोडी लांबवली

यावल : तालुक्यातील अंजाळे येथून 30 हजार रूपये किंमतीची बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याने शेतकर्‍याचे ऐन हंगामात मोठे नुकसान झाले आहे. ज्या खळ्यात बैलजोडी बांधली होती त्याच्या शेजारील खोलीत झोपलेली व्यक्ती बाहेर येवू नये म्हणून अज्ञात चोरट्यांनी त्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता. अंजाळे येथील महेश प्रकाश पाटील यांच्या खळ्यात बांधलेली 30 हजार रूपये किंमतीची बैलजोडी शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी लांबवली. विशेष म्हणजे खळ्यात बैलजोडी बांधलेली होती व शेजारील खोलीत महेश पाटील यांचे वडील प्रकाश अमृत पाटील हे झोपले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करून बैलजोडी लांबवली. मध्यरात्री प्रकाश पाटील हे झोपेतून जागे झाले व दरवाजा उघडून पाहिला असता दरवाजा उघडत नव्हता. खिडकीतून डोकावून पाहिले असता बैलजोडी जागेवर नव्हती. त्यांनी मोबाईलवर कॉल करून आपल्या मुलास माहिती दिली व बैलजोडीचा रात्री शोध घेतला मात्र, बैलजोडी आढळली नाही. शनिवारी यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक जवरे, राजेश महाजन करीत आहे.