यावल : अंजाळे घाटात बसने समोरून येत असलेल्या ट्रकला दिलेल्या धडकेनंतर झालेल्या अपघातात तीन प्रवासी गंभीर जखमी झाले तर सुदैवाने अन्य प्रवासी सुखरूप बचावले. गुरूवारी सकाळी 9.20 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. भुसावळ आगाराची भुसावळ-हिंगोणा बस (एम.एच.14 बी.टी.0442) ही हिंगोण्याकडे निघाली असतानाच अंजाळे घाट उतरत असताना समोरून येणारा ट्रक (जी.जे.एक्स.5862) ला बसने धडक दिल्याने बसचा वाहक साईडचा पुढील भागातील पत्रा मोठ्या प्रमाणात फाटला तर या अपघातात बसमधील शरद पंढरीनाथ दंडगव्हाळ (60) यांचा हात फ्रॅक्चर झाला तर अन्य दोघे प्रवासी किरकोळ जखमी झाले. घाटावरच झालेल्या अपघातामुळे दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. अपघातानंतर जखमींसह प्रवाशांना अन्य बसने हलवण्यात आले. अपघातानंतर यावलचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे व सहकार्यांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली तसेच क्रेनद्वारे अपघातग्रस्त वाहने हलवली.