अंजाळे घाटात मिनीडोअर उलटली : उड्या घेतल्याने प्रवासी बचावले

0

यावल- अवैधरीत्या प्रवाशांची वाहतूक करणारी मिनिडोअर अंजाळे घाटात उलटल्याची घटना सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने प्रवाशांनी चालत्या वाहनातून उड्या टाकल्याने ते बचावले. भुसावळ-यावल मार्गावर अनेक कालबाह्य झालेल्या वाहनांद्वारे अवैध प्रवाशांची वाहतूक कायम आहे. सोमवारी सकाळी भुसावळकडून यावलकडे प्रवासी घेऊन मिनीडोअर रीक्षा (एम.एच.19 जे.6068) येत असताना अंजाळे घाटाच्या चढावावर वाहनाचा वेग कमी झाल्याने मिनिडोअर रीक्षा खाली उलट्या दिशेने येऊ लागल्याने वाहनातील प्रवासी घाबरले व काहींनी रीक्षातून खाली उड्या घेतल्या. काही क्षणातच रीक्षा थेट दरीत कोसळली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. या अपघात एका बालिकेला किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातामुळे अवैध प्रवासी वाहतूक पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. घटनास्थळी गावातील नागरीकांनी धाव घेऊन तत्काळ त्या वाहनातून नागरिकांना बाहेर काढले.