प्रा. डॉ. राजेश लाटणे : मराठी भाषा दिनानिमित्त काव्य जागर
शेलपिंपळगाव । समाजाच्या अंतरमनाचा छेद घेणारा साहित्य प्रकार म्हणजे कविता असल्याचे प्रा. डॉ राजेश लाटणे यांनी सांगितले. मराठी भाषा दिन व कवी कुसुमाग्रज जन्मदिनानिमित्त चाकण येथील शिक्षण मंडळाच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात काव्य जागर व पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. राज्यभरातून अनेक कवी यामध्ये सहभागी झाले होते.बाप, आई, निसर्ग प्रेम, शेतकरी व कवी कुसुमाग्रजांच्या कविता यावेळी सादर करण्यात आल्या. कवी विकास राऊत यांची माय मराठीची गाथा ही कवीता रसिकांची दाद घेऊन गेली.
विविध पुरस्काराचे वितरण
पत्रकार व लेखक गोविंद राऊत यांच्या शुभहस्ते महाविद्यालयास करंडक प्रदान करण्यात आला. गझलकार सुनिलनाना पानसरे, प्रकाश बनसोडे, सुनिता काटम, दिपा गोसावी, मुक्ता भुजबळे, डी. के. वडगावकर, नितीन पवार, महेंद्र गाडे, संदेश जाधव, अॅड. प्रीतम अण्णा शिंदे यांना यावेळी विविध पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक माधव पाटील व जनता शिक्षण संस्थेचे उपप्राचार्य डी. डी. गोरे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते. खराबवाडी येथील नवमहाराष्ट्र विद्यालय अबोली राऊत हिने उपस्थितांचे स्वागत केले. प्रा. कजबे यांनी सुत्रसंचालन तर प्रा. एडाईत यांनी आभार मानले.