नवी दिल्ली: संविधानाने राष्ट्रपतीपदावर बसलेल्या व्यक्तीला कायदे संमत करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदावरील व्यक्ती संकुचित राजकीय हितांसाठी काम करू शकत नाही. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करताना आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐका, असे भावनिक आवाहन विरोधी पक्षांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मीरा कुमार यांनी केले. 28 जून रोजी मीरा कुमार राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. याआधीच त्यांनी देशातील खासदार आणि आमदारांना हे आवाहन केले.
आपल्याला जातीव्यवस्थेविरुद्ध लढण्याचा अनुभव
वसाहतींविरोधात संघर्ष करण्यात आणि जाती प्रथांमुळे होणार्या अत्याचारांविरोधात लढण्याचा आपल्याकडे अनुभव आहे. या दोन संघर्षांनी माझ्या संवेदनांवर, विचारांवर आणि माझ्या निर्णय क्षमतेवर मोठा परिणाम झाला. देशाच्या निर्मात्यांच्या विचारांचा माझ्यावर पगडा आहे. कितीही मतभेद असले, तरी जेव्हा मूल्यांच्या संरक्षणाचा आणि सामाजिक न्यायाची आवश्यकता असते, त्यावेळी आपल्या सर्वांचे लक्ष्य एकच असते. राष्ट्रपतीपदावरील व्यक्ती संविधानाच्या संरक्षणाची शपथ घेते. संकटकाळी संविधानच आपल्यासाठी मार्गदर्शक ठरले आहे’, असेदेखील मीरा कुमार यांनी म्हटले.