अंतराळ उद्योगात इस्त्रोचा बोलबाला

0

मुंबई । नवीन वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात भारताने, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (इस्त्रो) एक नवा विक्रम प्रस्थापित केला. इस्त्रोने एकाचवेळी 104 उपग्रहांना अंतराळात पाठवून रशियाचा उच्चांक मोडीत काढला. रशियाने सन 2014 मध्ये एकाच वेळी 37 उपग्रह अंतराळात सोडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन करताना सांगितले की, इंडिया सॅल्यूट अवर सायंटिस्ट, इस्त्रोची ही कामगिरी अतुलनीय असून, देशाला आणि अंतराळ संशोधन करणार्‍या सर्वांसाठी मैलाचा दगड आहे. इस्त्रोच्या या कामगिरीबाबत काही जणांना आक्षेप आहे तो कमी वजनाच्या उपग्रहांबाबत. इस्त्रोने जे उपग्रह एकाच वेळी अंतराळात सोडले ते सर्व 10 किलोपेक्षा कमी वजनाचे होते. त्यातील बहुतांश उपग्रह अमेरिकेचे होते. याशिवाय भारताचे दोन, कझाकिस्तान, इस्त्रायल, नेदरलँड्, स्विर्त्झलँड आणि युनायटेड अरब अमिरातीचा प्रत्येकी एका उपग्रहाचा समावेश होता. या सर्वांमध्ये भारताचा सर्वाधिक 75 किलोच्या आसपास जाणार्‍या वजनाचा एक उपग्रह होता. हा आक्षेप सोडला तर भारतीय तंत्रज्ञांनी ज्या कुशलतेने कुठल्याही स्वरूपाचा अपघात होऊ न देता एवढ्या उपग्रहांना त्यांच्या भ्रमणकक्षेत स्थापित केले त्याचे जगभरातील संशोधकांनी कौतुक केले.

जगभरातल्या वृत्तपत्रांची हेडलाइन व्हायची इस्त्रोची ही पहिलीच वेळ नव्हती. त्याआधी सन 2014 मध्ये इस्त्रोने मंगळ ग्रहाच्या कक्षेत मार्स ऑर्बिटर मिशन (एमओएम) अवकाशयान पाठवले होते. मंगळ ग्रहाच्या कक्षेेत अवकाश यान पाठवणारा चौथा देश आणि पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवणारा भारत पहिलाच देश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रोच्या या मोहिमेचे कौतुक करताना या मोहिमेसाठी ग्रॅव्हिटी या हॉलिवुड सिनेमापेक्षा कमी खर्च आल्याचा उल्लेख केला होता. भारताला या मोहिमेसाठी 73 अब्ज डॉलर्स इतका खर्च आला होता. एवढ्या कमी खर्चात भारताची मंगळाची ही मोहीम यशस्वी झाल्याने सगळ्यांना तो आश्‍चर्याचा धक्का होता. मंगळयानाच्या मोहिमेत भारतीय तंत्रज्ञांनी संशोधनापेक्षा तंत्रज्ञानावर भर दिला होता. त्यामुळे अंतराळ उपग्रह सोडण्यासाठी सर्वांचे लक्ष इस्त्रोने वेधून घेतले होते. नासाने 2013 मध्ये मॅवेन अवकाश यान मंगळाच्या दिशेने सोडले होते. त्यासाठी नासाला 671 अब्ज डॉलर्स इतका खर्च आला होता. पण या मोहिमेत अमेरिकेने संशोधनावर भर दिल्याने त्यांचा खर्च वाढला होता. भविष्यात आणखी कुठल्या देशाला जर मंगळच काय इतर कुठल्या ग्रहावर यान पाठवायचे असेल तर त्याकरिता त्यांची पहिली पसंती इस्त्रोलाच असेल हे नक्की.

इस्त्रोच्या भविष्यातील योजना
सध्या इस्त्रोचा जगभरात बोलबाला आहे यात शंकाच नाही. त्याकरिता भारत सरकारनेही वेळोवेळी त्याकरिता अंदाजपत्रकात मोठी तरतूद केली आहे. सन 2008 मध्ये इस्त्रोने पीएसएलव्ही मालिकेतील अवघे दोन उपग्रह अंतराळात सोडले होते. आता सन 2016 मध्ये हा आकडा सहावर पोहोचला. याशिवाय आगामी काळात सन 2008 मध्ये आखलेली लँड रोव्हर ही चांद्रयान मोहीम पुन्हा हाती घेणार आहे. याशिवाय आणखी एक मंगळाची मोहीम इस्त्रोने आखली आहे. शुक्र ग्रहाच्या उष्ण आणि आभाळी वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी इस्त्रोने शुक्र ग्रहावर वारी करण्याची योजना आखली आहे. सन 2020 मध्ये साधरणत: 12 ते 18 वेळा विविध उपग्रह सोडण्याचा इस्त्रोचा प्रयत्न आहे.

जागतिक बाजारपेठेतील इस्त्रोचे वेगळेपण
सध्या अंतराळ उद्योगाच्या बाजारपेठ 323 अब्ज डॉलर्सइतकी आहे. अमेरिकेत प्लॅनेट, व्हेक्टर स्पेस, स्पायर ग्लोबल, कॅपेला स्पेस आणि इतर अशी नवीन तंत्रज्ञान आणि अ‍ॅप्लिकेशन्स असलेली उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहेत. त्यात नॅनो स्वरूपातील उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात खूप खर्च होतो. अशावेळी इतर विकसित देशांच्या तुलनेत कमी खर्चात उपग्रह सोडणारी इस्त्रो सगळ्यांसाठी फायदेशीर ठरते. त्यात इस्त्रोमधील तंत्रज्ञ, संशोधक हे इतर देशांच्या तंत्रज्ञापेक्षा खूप पुढचा विचार करून आपल्या ग्राहकाला मार्गदर्शन करतात, त्याला संबंधित मोहिमेचा एक सिस्टिमॅटिक डाटा देतात हे एक वैशिष्ट्य आहे.

…तर सरकारलाही नाही म्हणतील
इस्त्रोने नेहमीच तळगाळातील संशोधनाला महत्त्व दिले आहे. देशातील सामान्य जनतेला तंत्रज्ञानाचा फायदा कसा मिळेल, याकडे इस्त्रोच्या संशोधक, तंत्रज्ञानाचा कल असतो. इस्त्रोच्या या बाण्याची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे. इस्त्रोबाबतीत बोलताना एक गोष्ट आवर्जून सांगितली जाते. राष्ट्राध्यक्षांचा महत्त्वकांक्षी उपक्रम आहे. म्हणून अंतराळात स्पेस स्टेशन किंवा तत्सम गोष्ट करण्यासाठी नासा कोट्यवधी डॉलर्स खर्च करतील. त्यात येणारे यशापयश हा मुद्दा मग गौण ठरतो. पण इस्त्रोमध्ये याच्या उलट परिस्थिती आहे. पंतप्रधान किंवा सरकारने सांगितले म्हणून एखादा उपक्रम हाती घ्यायचा असे इस्त्रोमध्ये होत नाही. देशातील सामान्य माणसाचे भले त्यातून होणार नसेल, तर इस्त्रोचे तंत्रज्ञ, संशोधक सरकारलाही हे होणार नाही, असे स्पष्टपणे सांगून टाकतात.

स्वयंपूर्ण तंत्रज्ञानावर इस्त्रोचा भर
आपल्या भारताची एक खासियत आहे ती म्हणजे आपण देशी तंत्रज्ञानावर खूप भर देतो. हादेखील इस्त्रोच्या यशाचा एक मजबूत पाया आहे. जेव्हा भारतात इस्त्रोची मुहूर्तमेढ झाली तेव्हा रशिया आणि अमेरिकेत चंद्रावर मानवाला पाठवण्याची चढाओढ लागली होती. भारताने मात्र या दोघा दादा देशांपेक्षा वेगळी वाट चोखळत अंतराळ क्षेत्रात स्वत:चे असे स्थान निर्माण केले. भारताने अंतराळात उपग्रह सोडून शेती, भूमापन, टेलीकम्युनिकेशन, टेलीमेडिसीन, नैसर्गिक आपत्ती याबाबत प्रगती केली.