विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांच्या भूमिकेकडे लक्ष
डॉ. गोपी सोरडे, जळगाव: अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व विधानपरिषदेच्या आमदार स्मिताताई वाघ आणि अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे आहे. एक आमदार सत्ताधारी गटातील तर दुसरे सहयोगी आहेत. त्यामुळे काही अंशी विकासकामे झाली असली तरी समाधानकारक विकासकामांची मात्र वाणवा आहे.अमळनेर मतदारसंघातील सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पाडळसरे धरण! माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे हे पाटबंधारेमंत्री असताना प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती.1995 ला प्रकल्पाचे भूमिपूजन झाले.आतापर्यंत केवळ 20 टक्के काम झाले. कदाचित प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असते तर अमळनेरसह पारोळा,धरणगाव,चोपडा,शिरपूर,शिंदखेडा तालुक्यातील शेतकर्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटला असता. पाडळसरे धरणासाठी 1500 कोटींचा निधी मंजूर झाला असला तरी निधीबाबत संभ्रम कायम आहे. एकंदरीत दोन्ही आमदारांचे सुरु असलेले श्रेयवाद आणि अंतर्गत कुरघोडी यामुळे अमळनेर मतदारसंघाचा विकास रखडला असल्याचे चित्र आहे.
अमळनेर मतदारसंघात 1995 ते 2004 पर्यंत डॉ.बी.एस.पाटील 2009 मध्ये कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी प्रतिनिधीत्व केले. तर 2014 मध्ये शिरीष चौधरी यांनी अपक्ष म्हणून प्रतिनिधीत्व करीत आहेत.तसेच विधानपरिषदेच्या आमदार स्मिताताई वाघ या देखील प्रतिनिधीत्व करीत आहेत. गेल्या दोन पंचवार्षिकपासून अमळनेर मतदारसंघ अपक्षांच्या हाती आहे. साहेबराव पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात निश्चितपणे काही विकासकामे केली दिसून येतात.गेल्या पाच वर्षात शासनाच्या विविध योजनांतून आमदार शिराष चौधरी यांनी 1400 कोटी तर आमदार स्मिताताई वाघ यांनी 700 कोटींची विकास कामे केल्याचा दावा करु लागले आहेत. 2009 आणि 2014 मध्ये साहेबराव पाटील आणि शिरीष चौधरी अपक्ष असले तरी सत्ताधार्यांच्या जवळ असल्यामुळे काही विकासकामे होवू शकलीत.बोरी नदीवर तीन पूल बांधण्यात आले आहेत.प्रताप कॉलेजजवळ उड्डाणपूलाचे काम झाले.15 वर्षापासून रखडलेले नाट्यगृहाचे काम पूर्ण झाले.तसेच टाकरखेडा उड्डाणपूलाचे देखील काम प्रगतीपथावर असल्याची वस्तूस्थिती नाकारता येणार नाही.आ.शिरीष चौधरी यांनी सीएसआर÷च्या फंडातून काही सिंचनाची कामे केली आहेत.मात्र पाडळसरे प्रकल्प पूर्ण करण्यात लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा कमी पडल्याची खंत निश्चितच आहे.
बेरोजगारीचा प्रश्न जटील
अमळनेरमध्ये प्रताप मिल होता.त्यावेळी अनेकांना रोजगार उपलब्ध होते. 20वर्षापूर्वी मिल बंद पडल्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला. गेल्या काही वर्षापासून एमआयडीसीचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र हा प्रश्न कोणीही सोडवू शकला नाही. निवडणुका आल्यात की, एमआयडीसीचा प्रश्न सोडविण्याचे केवळ आश्वासन दिले जाते.उद्योगधंदे नसल्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न जटील बनला आहे.
पाडळसरे प्रकल्पासह भूमिगत गटारींचे काम रखडले
पाडळसरे प्रकल्पाचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे.तत्कालीन पाटबंधारेमंत्री आ.एकनाथराव खडसे यांना प्रक्पाला मंजुरी दिली होती.1995 मध्ये प्रकल्पाचे भूमिपूजन झाले.त्यावेळी केवळ 147 कोटींमध्ये काम पूर्ण होणार होते.आता त्याच कामाला 2300 कोटी अपेक्षित आहे. प्रकल्पासाठी आंदोलन झालीत. त्यानुसार 1500 कोटींचा निधी मंजूर झाला. मात्र धरण समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांनी जेव्हा माहिती कायद्याअंतर्गत माहिती मागविली तेव्हा मंजूर झालेला निधी कुठल्या हेडखाली मिळणार यासंदर्भांत शासनाकडून सुस्पष्ट माहिती दिली गेली नाही. त्यामुळे निधी केव्हा मिळेल हे अनिश्चित तर आहेच परंतु संभ्रम देखील निर्माण झाला आहे.धरणाचे केवळ 20 टक्के काम झाले असून गेल्या पाच वर्षापासून काम बंद आहे. कदाचित प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असते तर अमळनेरसह पारोळा,धरणगाव,चोपडा,शिरपूर,शिंदखेडा तालुक्यातील शेतकर्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटला असता. खरं तर अमळनेरचे दोन्ही आमदार पुरेसा निधी आणू शकले नाहीत.तसेच शहरविकासासाठी 13 व्या आणि 14 व्या वित्त आयोगातून नपाला निधी मंजूर झाला आहे. विकासकामांसाठी निधी मिळाल्यानंतर ती कामे नपाने करावीत अशी धारणा आहे.मात्र आमदार शिरीष चौधरी यांनी ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने करण्यासंदर्भात पत्र दिले.त्यामुळे नपाने न्यायालयात धाव घेतली.े नपाने कामे करावीत असे आदेश न्यायालयान दिल्यानंतरही कामे होवू शकले नाही.भूमिगत गटार योजनेसाठी 80 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे.मात्र श्रेयवाद आणि अंतर्गत कुरघोडीमुळे विकासकामांचा खोळंबा झालेला दिसून येत असल्याची चर्चा आहे.
अमळनेरात तापणार राजकारण
अमळनेर मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी हे अपक्ष असले तरी सत्ताधारी भाजपच्या जवळचे आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार स्मिताताई वाघ,डॉ.बी.एस.पाटील,निवृत्त आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील इच्छूक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल भाईदास पाटील यांना उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली आहे.माजी आमदार साहेबराव पाटील आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील हे देखील भाजपवासी झाले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता असली तरी अपक्ष आमदार शिरीष चौधरी हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची राजकीय गोटात चर्चा आहे.त्यामुळे आमदार चौधरी अपक्ष लढतात की,भाजपकडून रणांगणात उतरतात याकडेही लक्ष लागले आहे. अमळनेरमध्ये आधीच भाजपात अंतर्गत गटबाजी आहे,आणि भाजपच्या इच्छूक असलेल्यांना भाजपने उमेदवारी दिली नाही तर कदाचित समिकरण बदल्याची दाट शक्यता देखील वर्तविली जात आहे. आमदार स्मिताताई वाघ यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती.मात्र ऐनवेळी उमेदवारी बदलवून आ.उन्मेष पाटील यांना देण्यात आली होती. विधानसभेला हीच पुनरावृत्ती झाली तर अमळनेरात राजकारण तापण्याची शक्यता आहे. कदाचित भाजपाला फटका बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
भाजपातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर
अमळनेर मतदारसंघात भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी असल्याचे उघडच आहे. लोकसभा निवडणूकीच्या वेळी झालेल्या मेळव्यात झालेल्या हाणामारीच्या प्रकरणात ही गटबाजी चव्हाट्यावर आली. त्यामुळे उदय वाघ यांना जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला.