अंतर्नादतर्फे 50 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

0

यावल तालुक्यातील कठोरा प्राथमिक शाळेत राबवला उपक्रम

भुसावळ- अंतर्नाद प्रतिष्ठानने गणेशोत्सवात पाच दिवस ‘एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम हाती घेतला आहे. त्यात तिसर्‍या दिवशी शनिवारी यावल तालुक्यातील कठोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 50 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी निवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी होते. जिल्हा परिषदेच्या सदस्या नंदा दिलीप सपकाळे, पंचायत समिती सदस्य लक्ष्मी विजय मोरे, जळगावच्या डीआयईसीपीडीचे अधिष्ठाता शैलेश पाटील, ज्ञानेश्वर घुले, माजी मुख्याध्यापिका वत्सला राणे-चौधरी, खासगी प्राथमिक शिक्षक सोसायटी भुसावळचे अध्यक्ष मिलिंद पाटील, संचालक रवींद्र पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान कोळी, मुख्याध्यापक विलास पाटील, अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष पोपटराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रास्ताविक भुसावळ येथील नूतन पतपेढीचे संचालक प्रदीप सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालक शिक्षक कमलेश पाटील यांनी केले. आभार ग.स.चे. संचालक योगेश इंगळे यांनी केले. अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. ज्यांच्याकडे अडगळीत पडलेले संगणक असतील, त्यांनी ते प्रतिष्ठानला द्यावे. दुरुस्त करून हे संगणक ज्या प्राथमिक शाळांमध्ये संगणक नसतील त्यांना ते भेट दिले जातील, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली. अमित चौधरी, अमितकुमार पाटील, संजीव भटकर, संदीप सपकाळे, मंगेश भावे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते 50 विद्यार्थ्यांना वह्या, उजळणी पुस्तक, पेपर लिहिण्याचे पॅड, पेन, पन्सील असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

स्वच्छतेला द्या प्राधान्य
प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवताना वाचन, चितंन, मनन आणि स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. आपल्या एखाद्या मित्राकडे शैक्षणिक वस्तू नसेल तर ती त्याला पुरवावी. शिक्षक वर्गात जे मार्गदर्शन करतात ते आचरणात आणावे, असा सल्ला ज्ञानेश्वर घुले यांनी विद्यार्थ्यांना दिला. उपेक्षित विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी अंतर्नादने गणेशोत्सवाला जे सामाजिक उपक्रमांचे कोंदण दिले ते पथदर्शी आहे, असे गौरवोद्गार निवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी यांनी काढले.