भुसावळ : येथील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे सावित्रीबाई फुले जयंतीदिनी सावित्रीच्या लेकींचा सन्मान करण्यात येणार आहे. द.शि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मंगळवार 3 रोजी सकाळी 9 वाजता कार्यक्रम घेण्यात येणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून तहसिलदार मीनाक्षी राठोड उपस्थित राहतील. द. शि. विद्यालयातील गरीब, होतकरू व हुशार मुलींना शालेय साहित्यासह पुस्तके देवून सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानंतर आजच्या सावित्रीच्या लेकी या विषयावर तहसीलदार मीनाक्षी राठोड उपस्थित मुलींशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम मुलीच हाताळणार आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
नाट्यपुस्तकाचे प्रकाशन
नाहाटा महाविद्यालयात 3 रोजी सकाळी 10 वाजता सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून सीमा भारंबे- बोरोले लिखीत ‘रूक्मिणी : एक समर्पित जीवन’ या नाट्य पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉ. मिनाक्षी वायकोळे, मुख्याध्यापक मायादेवी गोल्हाईत, नाट्यकर्मी विरेंद्र पाटील, अनिल कोष्टी, प्रमुख वक्ते डॉ. के.के. अहिरे, डॉ. आशालता महाजन, डॉ. दिलीप देशमुख उपस्थित राहणार आहेत.
गुणगौरव सोहळा
वरणगाव कला, वाणिज्य व विज्ञान विद्यालयात स्पर्धा परिक्षेत यश संपादन करणार्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सभापती राजेंद्र चौधरी, भारत मुक्ती मोर्चा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मुकुंद सपकाळे, नगराध्यक्षा अरूणा इंगळे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, अनिल पाटील, नगरसेविका माला मेढे, पोलिस दक्षता समिती सदस्या सविता माळी, सुरेश महाले, विनोद सुरवाडे, अमोल पाटील आदी उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाचे आयोजक प्रभारी भारतीय विद्यार्थी मोर्चा उत्तर महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष अजय इंगळे यांनी केले आहे.