अंतिम चारमध्ये मुंबईचा प्रवेश निश्चित तर पंजाबसमोर आव्हान

0

मुंबई। आयपीएलच्या दहाव्या सत्रात अव्वल चारमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे. मात्र अंतिम चारमध्ये स्थान मिळविण्याचे पंजाबसमोर सध्या जर-तर असे समीकरण निर्माण झाले आहे. गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादचा जर अखेरच्या सामन्यात पराभव झाला. पंजाबने उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर किंग्ज इलेव्हन पंजाबला प्लेऑफचे तिकीट मिळू शकते.

आयपीएल स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले असून 12 गुण मिळवत पंजाब पाचव्या स्थानवर आहे. उर्वरित दोन सामन्यामध्ये पंजाबला तगड्या मुंबई इंडियन्स आणि पुणे संघाचे आव्हान पेलावे लागणार आहे. दुसरीकडे हैदराबाद सनरायझर्सचा एक सामना शिल्लक असून त्यांच्या साखळी सामन्यातील शेवटचा सामना स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या गुजरात लायन्ससोबत होणार आहे. हैदराबादने 13 सामन्यापैकी 7 सामने जिंकले असून, एक सामना अनिर्णित राहिला आहे. 15 गुणांसह हैदराबाद गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. हैदराबादने गुजरात लायन्सला पराभूत केले तर किंग्ज इलेव्हन पंजाबचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येईल.