माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नांनी शेतकर्यांना मोठा दिलासा
मुक्ताईनगर- तालुक्यातील अंतुर्ली परीसरात शेतकर्यांना शेतीसाठी पाणी तसेच पिण्याच्या पाणी पुरवठा योजनांसाठी पुरवण्यात येणार्या वीज पुरवठ्यात वारंवार बिघाड तसेच कमी दाबाने विद्युत पुरवठ्याची समस्या असल्यामुळे या भागातील शेतकरी त्रस्त होते. या संदर्भात या भागातील शेतकरी व नागरीकांनी शेतीचे पाणी व पिण्याच्या पाण्याच्या समस्यांसंदर्भात विद्युत पुरवठा पूर्ण दाबाने होत नाही याची वारंवार तक्रार माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे केली होती. खडसे यांनी अंतुर्ली भागासाठी सबस्टेशन होण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर 132 केव्ही सबस्टेशनसाठी 55 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
पुरनाडला होणार सबस्टेशन
पुरनाड येथे 132 केव्ही सबस्टेशन साठी 55 कोटी रुपयांच्या कामांला मान्यता देण्यात आली आहे. 132 केव्ही सबस्टेशनमध्ये 25 एमव्हीए क्षमतेचे दोन रोहित्र कार्यान्वित होणार आहेत त्यामुळे मुक्ताईनगर येथील 132 केव्ही सबस्टेशनवरील दाब कमी होऊन वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व त्या अनुषंगाने उद्भवणार्या समस्यांपासून शेतकरी व नागरीकांना दिलासा मिळणार आहे. आठ ते दहा दिवसांत निविदा प्रकाशित होऊन या सबस्टेशन अंतर्गत सबस्टेशन वर्क, सिव्हिल वर्क, ट्रान्समिशन वर्क यासारखी कामे होणार आहेत.
27 वर्षानंतर दुसर्या मोठ्या 132 केव्ही सबस्टेशनला मंजुरी
उच्च दाबामुळे वारंवार मेन लाईन तुटत असल्याने नागरीक त्रस्त होते. नवीन सबस्टेशन मंजूर होत नसल्याने अंतुर्ली, सुकळी, दुई परीसरातून 132 केव्ही सबस्टेशनची मागणी होती तर वारंवार खंडित होणारा वीजपुरवठ्याने कमी दाबामुळे कृषीपंप जळण्याचे प्रमाण अधिक होते मात्र आता ही समस्या आता सुटणार आहे.