पिंपरी-चिंचवड : मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचा खर्च महापालिकेने करावा, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. 2015 पासून मागणी नाशिक, मुंबई, अंबरनाथ, कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील सर्व स्मशानभूमी व दफनभूमीमध्ये त्या शहरातील मूत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्काराचा, दफन करण्याचा खर्च महापालिकेकडून केला जातो. यामध्ये अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड,गवरी, तर दफनविधीसाठी खड्डा खोदून देणे, मिठाची व्यवस्था केली जाते. पिंपरी-चिंचवड शहरात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्काराचा, दफन करण्याचा खर्च महापालिकेने करावा, अशी डिसेंबर 2015 पासून मागणी आहे.
यासाठी अनेकवेळा जनआंदोलन केले. त्यानंतर तत्कालीन सत्ताधार्यांनी या मागणीची दखल घेऊन खर्च करण्यास मान्यता दिली होती. त्यावर आरोग्य मुख्य कार्यालयाने निविदा प्रसिद्ध केली होती. परंतु, या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. त्वरित निविदा प्रक्रिया राबवा नाशिक, मुंबई, अंबरनाथ, कोल्हापूर महापालिका क्षेत्रामध्ये राबविण्यात येत असलेल्या योजनेप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरात ही योजना राबविण्यासाठी त्वरित निविदा प्रकिया राबविण्यात यावी. आरोग्य विभाग वैद्यकीय विभागामध्ये समन्वय ठेवून ही योजना राबविताना कुठलीही त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घेऊन ही योजना लवकरात-लवकर कार्यान्वित करावी, अशी मागणी भापकर यांनी निवेदनात केली आहे.