अंदमानमध्ये 5.9 रिश्टर स्केलचा भूकंप

0

नवी दिल्ली । पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊनही देशात सुरू असलेल्या राजकीय धुमधामीत मंगळवारी सकाळी अंदमान निकोबार द्विपसमूहात भूकंपाचे तीव्र धक्के अनुभवायला मिळाले. भारतीय हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, सुमारे 5.9 रिश्टर स्केल एवढी तिव्रता असलेल्या या भूकंपात कुठल्याही स्वरुपाची जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. मंगळवारी सकाळी 8.21 मिनिटांनी भूकंपाचे झटके अनुभवायला मिळाले. मात्र, त्सुनामीचा धोक्याचा इशारा देण्याइतपत या भूकंपाची तिव्रता नव्हती. निकोबार बेटांच्या 6.4 अक्षांश उत्तरेला आणि 92.2 अक्षांश पूर्वेला 10 किलोमीटर आत या भूकंपाचे केंद्र होते. या भूकंपाच्याआधी पहाटे 5 वाजून 48 मिनिटांनी काश्मीरमधील कठुआ येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तिव्रता 3.6 रिश्टर स्केल एवढी होती. याशिवाय गुजरातच्या उत्तर विभागात असलेल्या बनासकांठा जिल्ह्यातही सोमवारी मध्यम तिव्रतेचे, 4.4 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले. दुपारनंतर झालेल्या या भूकंपाचे केंद्र याच जिल्ह्यातील दीसा येथे उत्तर पश्‍चिम येथे 32 किलोमीटर अंतरावर होते असे गांधीनगर येथे असलेल्या भूकंपशास्त्र संशोधन केंद्राच्या सूत्रांनी सांगितले.

4 मार्च
मेघालयातील पश्‍चिम खासी डोंगराळ भागात झालेला 3.3 रिश्टर स्केल इतक्या तिव्रतेने हा भूकंप दुपारी 12.20 मिनिटांनी झाला होता. या भूकंपाचे केंद्र 10 किलोमीटर खाली होते.
आसाममध्ये सकाळी 7. 39 मिनिटांनी झालेला भूकंप 5 रिश्टर स्केल एवढ्या तिव्रतेचा होता. या भूकंपामुळेही कुठलेही हानी झाली नाही.

मणिपुरमधील चंदेल जिल्ह्यात पहाटे 5.02 मिनिटांनी झालेला हा भूकंप 3.5 रिश्टर स्केलचा होता. भारत म्यानमार सिमेपाशी या भूकंपाचे केंद्र होते. त्याआधी राज्यातील चुराचंदपूर येथे 24 फेब्रुवारी रोजी मध्यम तिव्रतेचा, 5.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.

6 मार्च
जम्मू-काश्मीरमधील उत्तर पश्‍चिम भागात झालेला हा भूकंप 4.8 रिश्टर स्केल क्षमतेचा होता.
या भूकंपामुळे या विभागात कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाही. मात्र या भूकंपानंतर झालेल्या भौगोलिक सर्वेक्षणात भविष्यात या भागात 8 रिश्टर स्केलपेक्शा जास्त क्षमतेचा भूकंप होण्याचा धोका दर्शवण्यात आला आहे.

8 मार्च
मणिपूरमधील उखरूल 4.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपमामुळे जीवित किंवा कुठल्याही मालमत्तेच नुकसान झाले नसले तरी मणिपूरच्या जनतेेत त्यामुळे भीती निर्माण झाली होती.
हिमाचल प्रदेशमधील चंबा विभागात 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. मध्यम तिव्रतेच्या या भूकंपाचे धक्के जाणवल्यावर लोकांनी घराबाहेर मोकळ्या रस्त्यांवर धाव घेतली होती.
महिनाभराच्या अवधीत या भागात झालेला हा चौथा भूकंप होता.

13 मार्च
गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात 4.4 रिश्टर स्केल तिव्रता असलेला भूकंप झाला. गुजरातच्या उत्तर भागाततील दीसा येथे या भूकंपाचे केंद्र होते. आसाममध्ये दुपारी 4.04 वाजता दरांग येथेही भूकंपाचे धक्के बसले. दरांगमध्ये झालेला भूकंप 4.3 रिश्टर स्केल तिव्रतेचा होता. दरांगपासून 10 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्र होते.

उत्तरपूर्व राज्यांमध्ये भूकंपाचे क्षेत्र वाढणार?
देशामध्ये विशेषत: उत्तर पूर्व राज्यांमध्ये भूकंपाचे क्षेत्र वाढण्याचा धोका दर्शवण्यात आला आहे.राष्ट्रीय भूभौतिक संशोधन केंद्राच्या अधिकार्‍यांच्या मते गेल्या दशकात झालेल्या दोन मोठ्या भूकंपामुळे उत्तर पूर्व राज्यांमध्ये भूकंप प्रवण क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. मागील दशकातील 2004 मध्ये डिसेंबर महिन्यात झालेल्या 9.1 रिश्टर स्केल आणि 2005 मध्ये मार्च महिन्यात झालेल्या 8.7 रिश्टर स्केला क्षमतेच्या भूकंपामुळे हे क्षेत्र वाढण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे. सुमात्रा बेटांवर झालेल्या भूकंपाची तिव्रता 1200 किलोमीटर अंतरापर्यंत होती. त्यावेळी या भूकंपामुळे पृथ्वीच्या भ्रमणवेगातही फरक पडला होता. त्या भूकंपाएवढा नसला तरी त्या दोन मोठ्या भूकंपाचा परिणाम उत्तर पूर्व राज्यांमध्ये भविष्यात जाणवण्याची शक्यता आहे.