पुणे । स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांनी दिलेल्या अनेक स्थळांच्या नावात बदल करण्यात आला. अद्यापही अंदमान व निकोबार बेटांची नावे मात्र तीच आहेत. या बेटांना शहीद व स्वराज्य या नावाने ओळखले जावे, अशी इच्छा नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी व्यक्त केली होती. शासनाने त्या बेटांना शहीद आणि स्वराज्य ही नवे देऊन नेताजी सुभाष चंद्र बोस यांची इच्छा पूर्ण करावी अशी मागणी ‘क्रांतितीर्थ : काला पाणी-अंदमान’ या पुस्तकाचे लेखक मधुकर आडेलकर यांनी केली.
अंदमान व निकोबार द्वीपसमूह स्वतंत्र झाल्याची घोषणा 30 डिसेंबर, 1995ला केली होती. त्याचवेळी अंदमान हे शहीद आणि निकोबार हे स्वराज्य या नावाने ओळखले जाईल, अशी इच्छा नेताजींनी व्यक्त केली होती. या घटनेला 70 वर्षे उलटूनही अद्याप तीच नावे कायम आहेत. हे पुस्तक ‘माझी जन्मठेप’ या सावरकरांच्या पुस्तकानंतरचे एकमेव असे ऐतिहासिक पुस्तक आहे. सावरकरांनी पहिले स्वातंत्र्य समर असे नाव दिलेला 1857चा स्वातंत्र्य लढा असून या लढ्यात मारल्या गेलेल्या स्वातंत्र्यवीरांची माहिती व फोटो या पुस्तकात आडेलकरांनी नमूद केली असल्याचे भाई वैद्य यांनी याविषयी बोलताना सांगितले.