पुणे । महापालिकेचे सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून मंगळवारी (27 फेब्रुवारी) स्थायी समितीकडून हे अंदाजपत्रक सादर करण्यात येणार आहे. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक झाल्याचे परिणाम या अंदाजपत्रकावर जाणवण्याची शक्यता असून स्थायी समिती अंदाजपत्रकात गेल्या वर्षीपेक्षा वाढ होणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. उत्पन्न-खर्चाचा मेळ साधण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
योजनांचा निधी अन्य कामांना
महापालिकेचे सन 2017-18 या आर्थिक वर्षांसाठीचे 5 हजार 912 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीने केले होते. यामध्ये विविध महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश करण्यात आला होता. प्रत्यक्षात अंदाजपत्रकात प्रकल्प आणि योजनांसाठी देण्यात आलेला निधी अन्य कामांसाठी देण्यात आला. त्यातून प्रकल्प तसेच योजनाही मार्गी लागल्या नाहीत आणि खर्चही वाढत गेला. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ न राहिल्यामुळे महापालिकेला वर्षभरात जवळपास 1700 कोटींहून अधिक अंदाजपत्रकीय तुटीला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर आगामी वर्षाचे (2018-19) अंदाजपत्रक वास्तवदर्शी करण्याचे आव्हान स्थायी समितीपुढे असणार आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या या अंदाजपत्रकाकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सन 2018-19 या वर्षांसाठीचे पाच हजार 397 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला दिले आहे. हे अंदाजपत्रक अंतिम करण्याची प्रक्रिया स्थायी समितीकडून सुरू झाली आहे.