पुणे । महापालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर हा विभाग महापालिका आयुक्तांच्या नियंत्रणाखाली सुरू आहे. त्यामुळे शिक्षण विभागासाठी स्वतंत्र अंदाजपत्रक तयार न करता त्यासाठी होणारा खर्च इतर विभागांप्रमाणेच पालिकेच्या 2017-18 च्या अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यास गुरूवारी झालेल्या मुख्यसभेत रात्री उशीरा मान्यता देण्यात आली. मुख्य सभा मान्यता देईल या भरवशावर स्थायी समितीने ऑगस्ट महिन्यात या प्रस्तावास मान्यता दिली होती. मात्र, त्यानंतर ऑगस्ट महिन्याची सभा वेगवेगळया करणास्तव तब्बल 5 महिने तहकूब करण्यात येत होती. अखेर गुरूवारी या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.
राज्यशासनाच्या आदेशानुसार, महापालिका प्रशासनाकडून 14 जुलै रोजी शिक्षण मंडळ बरखास्त केलेले आहे. त्यानुसार, महापालिकेकडून शिक्षण समिती स्थापन करणे अपेक्षीत आहे. मात्र, त्याचा निर्णय राज्यशासनावर सोपवून प्रशासनाने मंडळाचा कारभार आपल्या ताब्यात ठेवला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी शिक्षण मंडळ आता पालिकेचा भाग असल्याने त्याचे अंदाजपत्रक स्वतंत्र न करता ते पालिकेच्या अंदाजपत्रकातच समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, स्थायी समितीने मान्यता दिल्यानंतर त्याची अंमलबाजवणी सुरू करण्यात आली होती. मात्र, या प्रस्तावास अद्याप मुख्यसभेची मान्यता नव्हती अखेर गुरूवारी त्यास मान्यता देण्यात आली.