सविता भारती विद्यापीठ परिसरात राहते. वडील कंपनीत कार्यरत आहेत. आई गृहिणी आहे. बहिणी विवाहीत आहेत. साधारण वयाच्या सातव्या वर्षी सविताला पूर्णच अंधत्व आले. कोथरुडमधील अंध शाळेत व कर्वेनगर येथील महिलाश्रम हायस्कूलमध्ये वसतीगृहात राहून तिने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अकरावीला महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर तिला बाहेरच्या जगाची-तिथल्या आव्हानांची नव्याने ओळख झाली.
कॉलेजच्या पहिल्याच दिवशी किरकोळ दुखापत झाली. सरावाने ती भारती विद्यापीठ ते स. प. महाविद्यालय हा प्रवास एकटी बसने करू लागली. सुरुवातीला ती अलिप्त राहायची. हळूहळू तिला मित्र-मैत्रिणी मिळाल्या. ते तिला बसस्टॉपवर सोडण्यासाठी तसेच अभ्यासात मदत करायचे. शिक्षकही सहकार्य करायचे. असेच हसतमुखाने अडचणी सोडवत सविता समाजशास्त्र विषयातून पदवीधर झाली.
पदवीनंतर तिने टेलिफोन ऑपरेटरचा कोर्स केला. कंपन्यांमध्ये टेलिफोन ऑपरेटरची नोकरी केली. सरकारी नोकरी पाहावी, या विचारानेे सविताने मैत्रिणीसोबत बँकींगच्या परीक्षांचा अभ्यास सुरू केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अंध विद्यार्थी अध्ययन केंद्रात संगणकाचे प्रशिक्षण घेतले. तिथे बरेचसे अभ्यास साहित्य उपलब्ध झाल्याने चांगला अभ्यास झाला. 2015 मध्ये ती बँकींगची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि तिला मार्ग गवसला. कामावर रुजू होताना कागदपत्रावरील नावामध्ये काहीशी चूक झाल्याने तिला व कुटुंबियांना फारच त्रास सहन करावा लागला. 2016 मध्ये ती बँकेत लिपिक पदावर रुजू झाली. आता सर्व सहकार्यांसोबत उत्तमरित्या कार्यरत आहे.
– संध्या टोमके, पुणे
नोकरीच्या रुपाने मला कष्टाचे फळ मिळाले. पुढे मी पदोन्नतीच्या परीक्षा देणार आहे. आयुष्यात हार मानायची नाही, अडचण आली की मार्ग निघतोच. सध्या मी बसनेच प्रवास करते. प्रवासात बर्याच अडचणी येतात. पण, मी धाडसाने सगळीकडे वावरते.
– सविता साळवे