अंधश्रद्धा निर्मूलन समितीने रोखला बालविवाह

0

यवत । देऊळवाले समाजामध्ये येथे दोन विवाह होणार होते. या विवाहासाठी अकलूज, सोलापूर, नगर आदी ठिकाणावरून मोठ्या संख्येन वर्‍हाडी जमले होते. विवाहाची जोरदार लगबग सुरू होती. मात्र या दोन विवाहा पैकी एक जोडपे अल्पवयीन होते त्याची खबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीला लागली. आणि समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी पोलिसांच्या मदतीशिवाय देऊळवाले समाजाचे प्रबोधन करीत नियोजित विवाह रोखला.

मंडपातच घेतली बैठक
बोरीपारधी (ता. दौंड) येथील देऊळवाले समाजामधील अल्पवयीन वर आणि वधूचा होणारा बालविवाह रविवारी (दि. 25) बोरीपारधी येथे बालविवाह होणार असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मिळाली होती. त्यानुसार या विवाहाच्या ठिकाणी नंदिनी जाधव दाखल झाल्या. दोन नियोजित विवाहापैकी एका विवाहाचे वराचे वय 20 वर्षे तर वधूचे वय 15 वर्षे असल्याची खात्री पटली. यानंतर जाधव यांनी देऊळवाले समाजाची विवाह मंडपात बैठक घेत अल्पवयीन वयात मुला-मुलींचे विवाह केल्यास त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने होणारे दुष्परिणाम आदी तीन तास प्रबोधन केले.

तरुणांनी घेतला पुढाकार
देऊळवाला समाजाला नंदिनी जाधव यांचे मत पटल्याने होणारा बालविवाह रद्द करण्यात आला. तशा प्रकारचे वर वधुकडून जाधव यांनी वर वधूचे वय पूर्ण झाल्यावर हा विवाह याच ठरलेल्या वधू वराशी करण्यात येईल, असे लेखी घेतले. तसेच भविष्यात असे बालविवाह होणार नसल्याबाबत देऊळवाले समाजाचे तरुण पुढाकार घेणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.