अंधांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा विजय

0

नवी दिल्ली : नुकतेच इंग्लंडच्या संघाला तिन्ही प्रकारांत पाणी पाजल्यानंतर भारतीय अंध संघाने देखील इंग्लंडच्या अंध संघाचा पराभव करत धक्का दिला आहे. भारताच्या सुखम माझी (नाबाद ६७), गणेश मुंडकर (नाबाद ७८) यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारतीय दृष्टिहीन संघाने अंधांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंड संघाचा १० गडी राखून पराभव केला.

इंग्लंडची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी
इंदूर येथील होळकर मैदानावर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा खेळताना इंग्लंड संघाचा डाव १९.४ षटकांत १५८ धावांवर संपुष्टात आला. यात जस्टिन हॉलिंग्सवर्थ (२४), नॅथनील फॉय (७), लुक सुज (१६), एडवर्ड होसेल (५७), डॅनियल फिल्ड नाबाद (११) यांनी धावा केल्या. भारताकडून केतन पटेल (२-४०), वेंकटेश राव (१-२०), सुनील (१-१२), सोनू गोलकर (१-१७), इक्बाल जाफर (१-१०) यांनी सुरेख गोलंदाजी करून विजयाचा पाया रचला.

२५ हजार प्रेक्षकांची हजेरी
भारत संघाने हे आव्हान ११ षटकांत एकही गडी न गमावता १५९ धावा काढून पूर्ण केले. यात सुखम माझीने ३२ चेंडूत  १२ चौकारांच्या मदतीने नाबाद ६७ धावा व गणेश मुदाकरने ३४ चेंडूत १५ चौकारांच्या साह्याने नाबाद ७८ धावा करून संघाला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्यासाठी इंदौरमधील सुमारे २५ हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. यामध्ये ७५ ते ८०% प्रेक्षक हे महाविद्यालयीन युवक व युवती होत्या.

केवळ मनोरंजन नाही
या सामन्याकडे फक्त मनोरंजन म्हणून नाही तर शिक्षण आणि साहस या दृष्टिने पाहिला. यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी मला येवून विचारले की, हे अंध क्रिकेट कसे खेळतात. मग मी त्यांना सीस्याचे लहान गोळे असलेला चेंडू दाखविला आणि या अंध क्रिकेटसंबंधी थोडी माहिती व नियम सांगितले. हे ऐकून त्यांना नवल वाटले, की बीसीसीआयचे क्रिकेट आणि या क्रिकेटमध्ये खूप फरक आहे. तेथे आपण फक्त सामन्याचा आनंद लुटतो, पण या दृष्टिहीन खेळाडूंकडून खूप काही शिकण्यासारखेसुद्धा आहे, असे डॉ. अनिल भंडारी, अध्यक्ष, मध्य प्रदेश क्रिकेट यांनी सांगितले.