अंधाच्या सेवेने तीर्थक्षेत्र घोराडेश्वर दररोज प्रकाशमय!

0

पिंपरी-चिंचवड : तीर्थक्षेत्र घोराडेश्वर एका दृष्टीहीन अवलियाच्या सेवेने प्रकाशमान होत आहे. ईश्वराकडे आपण तिमिरातून तेजाकडे नेण्यासाठी प्रार्थना करीत असतो. मात्र ज्याच्या आयुष्यात ईश्वरानेच कायमचा अंधार भरला आहे तो अवलीया यावर कधीही निराश झाला नाही. उलट गेली 23 वर्षे मंदिरात पहिला दिवा लावून अंधाराला नाहीसे करीत आहे. त्याच्या या अखंड सेवेने जणूकाही तोच साक्षात महादेवाला तिमिरातून तेजात आणत आहे, असेच वाटते. सोमनाथ ऊर्फ सोमा हरिभाऊ लांडे (वय 44) असे दृष्टीहीन असलेल्या या अवलियाचे नाव आहे.

पाचव्या वर्षी अंधत्व
वयाच्या पाचव्या वर्षी देवीच्या रोगाने दोन्ही डोळे निकामी झालेले! कायमचे अंधत्व असूनही डोळस माणसाला लाजवेल अशी कामगिरी गेली तेवीस वर्षे सोमनाथ करीत आहे. हार-तेल घेऊन नित्यनियमाने तीर्थक्षेत्र घोरावडेश्वराचा डोंगर चढत महादेव मंदिरातील सकाळची पहिली पूजा व दिवा लावणीचे काम तो ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता अविरतपणे करतो आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूत त्याची ही सेवा अखंडपणे चालू आहे. सोमाच्या दिवसाची सुरुवात पहाटे साडेचारपासूनच होते. वद्ध आई-वडिलांची सुश्रुषा केल्यानंतर सोमाची पावले वळतात ती घोरावडेश्वर डोंगराच्या दिशेने!

नित्यनेमाने पूजाअर्चा
येथील जिजामाता चौकात सोमा सकाळी सहाच्या आसपास नियमित हजर असतो. गावातील दुचाकीस्वार, चारचाकीस्वार, किंवा निगडीच्या पीएमपीएल बसचा ड्रायव्हर-कंडक्टर गाडी थांबवून सोमाला पुणे-मुंबई महामार्ग ओलांडून देत थेट घोरावडेश्वर डोंगर पायथ्याला सोडतात. मग सोमा तेथील नंदीला पाणी हार घालून डोंगरावर चढण सुरू करतो. अवघ्या बारा ते पंधरा मिनिटात थेट घोरावडेश्वर मंदिरात पोचतो. तेथे महादेवाची पूजा अर्चा करतो. गणपती, मारूती आणि पांडुरंगाच्या मूर्तींना हार घातल्यानंतर त्याचा तळेगावकडे परतीचा मार्ग सुरू होतो.

चार कुत्री देतात साथ
घोरावडेश्वराची अरूंद अवघड चढण विनासायास पार पाडण्यास आपणास चार कुत्र्यांची नियमित साथ मिळते, असे सोमा अभिमानाने सांगतो. लांबून सोमा येताना दिसताच ही कुत्री शेपटी हलवत सोमाजवळ येतात. मग त्यांना पाव आणि बिस्कीटे टाकली जातात. हलका आवाज काढत, डोंगर चढून पुन्हा खाली येईपर्यंत अंध सोमाच्या वाटाड्याचे काम हे चार श्वान करताताना दिसतात. ओळखीचे झालेले या डोंगरावरील पक्षीही निरनिराळे आवाज काढून सोमाला रस्त्याचे संकेत देतात.

लवकरच सत्कार
संतोष तरस, अभिजीत चौधरी, सचिन गावडे, कैलास ढोरे यांच्यासारख्या शिवभक्तांमुळे हार व तेल मोफत मिळत असल्याचे सोमा सांगतो. सोमा अविवाहित आहे. शिक्षणाचा गंध नसतानाही आपल्या सहाव्या इंद्रियाच्या जोरावर मोबाईल देखील वापरतो. नाणी आणि नोटा तो स्पर्शाने ओळखतो. जीवनात अंधकार देऊनही भोलेबाबाच्या बाबतीत सोमा कधीही निराश नाही. शिवभक्त आणि धार्मिक वृत्तीच्या सोमाची ही अखंड वारी चालूच राहणार आहे. संतोष भेगडे मित्र परिवाराच्या वतीने सोमनाथ लांडे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे, असे नगरसेवक संतोष भेगडे यांनी सांगितले.