अंधाराचा फायदा घेत प्रवासी कार घेवून पसार

0

जळगाव : मुंबई हुन जळगाव तेथुन जामनेर कडे जात असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सच्या कार चालकाला अंधार्‍या ठिकाणी मध्यरात्री खाली उतरवुन पॅसेंजर कार घेवुन पसार झाल्याची घटना काल मध्यरात्री घडली. औद्योगीक वसाहत पोलिसात या प्रकरणी दोन संशयीताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतील भांडूप येथील रहिवासी तथा खासगी ट्रॅव्हल्स कार वरील चालक देवांग सतिष भाई रावळ (वय-27) यांनी औद्योगीक वसाहत पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमुद केल्या नुसार, वाशिम येथील रहिवासी आनंद सक्सेना (ए-सेक्टर,10 वाशि) यांनी मुंबई ते जळगाव प्रवासा करीता इन्होव्हा कार बुक केली होती. आनंद सक्सेना व त्याच्या सोबत आणखी एक अशा दोन प्रवाश्यांना घेवुन इन्व्होवा कार(क्र.जी.जे.09बीडी.1877) ने मुंबईहुन काल रात्री जळगावी दाखल झाले. जळगाव येथुन जामनेर कडे जात असतांना विटनेर येथील जिल्हापरीषद शाळेजवळ लघु शंकेसाठी उतरले असतांना आनंद सक्सेना याने कार घेवुन पळ काढला. पहाटे अडीच वाजेच्या सुमारास रावळ यांनी विचारपुस करीत औद्योगीक वसाहत पोलिस ठाणे गाठले. कार पळवुन घेवुन जाणार्‍या दोघा संशयीतांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात येवुन औरंगाबादच्या दिशेने सर्व पोलिस ठाण्यांना वायरलेस संदेशाने कळवण्यात आले. मात्र दुसर्‍या दिवशी दुपार पर्यंत कार मिळून आलेली नाही. तपास पोलिस उपनिरीक्षक एन.बी.सुर्यवंशी करीत आहे.