अंधाराचा फायदा घेत लाखोंचा ऐवज घेऊन चोरटे पसार

0

जळगाव । गेल्या काही दिवसांपासून शहरासह उपनगरांमध्ये चोरट्यांनी धुमाकुळ घातला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. रविवारी मध्यरात्री देखील तोंडाला रूमाल बांधलेल्या दोन चोरट्यांनी तांबापूरा भागातील अजमेरी गल्लीतील एक घर फोडून तेथून 2 तोळे सोन्याचे दागिने तसेच 900 ग्रँम वजनो चांदीचे दागिने यासह तीस हजार रुपयांची रोकडे असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. मात्र, घरातून चोरटे दागिने घेवून पसार होतांना कुटूंबियांना दिसताच त्यांनी चोट्यांचा पाठलाग केला. परंतू अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी सव्वा लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात घरमालकाने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोन चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तांबापुरा भागातील अजमेरी गल्लीतील मुसा किरणाजवळ शेख शाकीर शेख सौकत (वय-40) हे पत्नी चाँद बी, मुले शेख सईद व शेख शरीफ व मुलगी आयेशा बी यांच्यासह राहतात. तर शाकीर हे भाजीपाला विक्री करून आपल्या घराचा उदरनिर्वाह करतात. यासोबतच त्यांच्या पत्नी ह्या देखील घरासमोरच बसून पापड विक्री करतात. घरात गरम होत असल्याने शाकीर हे रविवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास कुटूंबियांसोबत घराला कुलूप लावून शेजारीच राहत असलेले सासरे शेख मुनीर शेख अहमद यांच्या घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले. घराला कुलूप पाहून दोन चोरट्यांनी कूलूप तोडून आत प्रवेश केला आणि दरवाज्या शेजारीच असलेल्या कपाटातील 2 तोळे सोने, 900 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने यासह तीस हजार रुपयांची रोकडे चोरले

अन् चोरटे पसार होताना दिसले
मात्र, रमजान महिना सुरू असल्याने शेख कुटूंबियांचे उपवास सुरू आहेत. त्यामुळे मध्यरात्री 2.25 वाजेच्या सुमारास सैरीचे जेवन बनविण्यासाठी शेख कुटूंबिय उठले आणि छतावरून खाली उतरत असतांनाच त्यांना तोंडाला रूमाल बांधलेले दोन जण घरातून बाहेर निघतांना दिसताच त्यांनी चोर-चोर आरडा-ओरडा केली. कुटूंबिया जागी झाल्याचे पाहताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. चोरटे पळत असल्याचे पाहताच शेख शाकीर यांनी चोरट्यांच्या मागे धाव घेतली. काही अंतरापर्यंत चोरट्यांचा पाठलाग केल्यानंतर चोरट्यांनी अंधराचा फायदा घेत बिसमिल्ला चौकाकडे धाव घेवून सव्वा लाखांचा ऐवज घेऊ पसार झाले.

सोने चांदीचे दागिने लंपास
चोरटे पसार झाल्यानंतर शेख कुटूंबिय घरात आल्यानंतर त्यांना दरवाज्याचा कुलूप गायब झालेले दिसले. त्यानंतर घरात प्रवेश करताच चोरट्यानी कपाट फोडलेले व त्यातील कपडे अस्ताव्यस्त फेकेले दिसून आले. कपाटातील 2 तोळे सोने व 900 ग्रॅम चांदी व काही रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले. यानंतर आतल्या खोली गेल्यानंतर त्याठिकाणी ठेवलेल्या पाकिटातील रक्कम चोरट्यांनी चोरून नेली होती. असा संपूर्ण सव्वा लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे समजताच त्यांना धक्काच बसला.

सून व मुलीसाठी जमवले दागिने
शेख शाकीर व त्यांच्या पत्नी यांनी गेल्या तेरा ते चौदा वर्षापासून भाजीपाला विक्री व पापड विक्री करून मेहनतीने जमापंंुंंजी जमवली होती. दरम्यान, मोठा मुलगा शेख सईद याचे नुकतेच काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाल्याने येणार्‍या सुनेसाठी शाकीर यांनी जमापुंजीतून सोने-चांदीचे दागिने केले होते. तर लहान मुलगी आयेशा बी हिच्यासाठी देखील सोन्याचे व चांदीचे करून ठेवले होते. मात्र, रविवारी मध्यरात्री दिड तासातच चोरट्यांनी घरात डल्ला मारीत संपूर्ण जमापुंजी चोरून नेली.

काही अंतरावर सापडला तोंडाला बांधलेला रुमाल
घरातून सव्वा ते दिड लाखांचा ऐवज चोरीला गेल्यानंतर चोरटे तांबापूरातील असल्याचा संशय असल्याने शाकीर शेख व शेजारी-पाजारी राहणार्‍या तरूणांनी रात्रभर चोरट्यांचा तांबापूरा भागात शोध घेतला. मात्र, त्यांना चोरटे मिळून आले नाही. परंतू घराच्या काही अंतरावरच शाकीर शेख यांना रात्री चोरट्याने बांधलेला स्कार्फ हा रस्त्यात पडलेला मिळून आला. त्यांनी तो स्कार्फ घरी आल्यानंतर तो घरातील सदस्याचा असल्याचे समजले. यानंतर चोरट्यांनी घरातील कपड्यांचा तोंडाला बांधण्यासाठी वापर केल्याचे शेख कुटूंबियांना कळाले.

तांबापुरात रात्रभर चोरट्यांचा शोध
शेख शाकीर व शेजारी-पाजारी राहणार्‍या तरूणांनी चोरी झाल्यानंतर संपूर्ण तांबापूरात फेरफटका मारून चोरट्यांचा शोध घेतला. परंतू त्यांना चोरटे मिळून आले नाही. अखेर शेवटी शाकीर यांनी एमआयडीसी पोलिसांना घरात चोरी झाल्याचे कळविले. काही मिनिटातच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. पण, त्यांना चोरट्यांबाबतचा काहीही सुगावा लागला नाही. यानंतर सोमवारी सकाळी शेख शाकीर यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत अज्ञात चोरट्यांविरूध्द तक्रार दाखल केली.

चोरट्याने बांधलेला रूमाल (स्कार्फ) हा रस्त्यातच सापडला. तो रूमाला शाकीर यांनी घरी आल्यानंतर पोलिसांनाही दाखवला. नंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र, श्‍वान पथक घटनास्थळी आले नव्हते. श्‍वानपथक आले असते तर रूमालामुळे चोरटे कोणत्या दिशेने गेलेत ते तरी पोलिसांना कळाले असते, पण श्‍वान पथक आलेच नाही.

नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
तांबापुरात झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरासह उपनगरांमध्ये चोरट्यांनी चांगलाच धुमाकुळ घातला आहे. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दम्यान, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घरफोड्याच्या घटनांमध्ये कधी घट होवून त्यांना कधी आळा बसेल, असा प्रश्‍न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. पोलिसांकडून जरी काही चोरीच्या घटना उघडकीस करण्यास यश येत असले तर शहरात झालेल्या मोठ-मोठ्या घरफोड्या उघडकीस आणण्यास मात्र त्यांना अपयश आले आहे.