मुंबई : दूध भेसळ करणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने हाती घेतलेली धडक मोहीम अद्याप सुरूच आहे. मंगळवारी पहाटे अंधेरीच्या जीवन नगरमध्ये छापा टाकून पोलिसांनी भेसळ करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३२८ लिटर भेसळयुक्त दूध तसेच त्यासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
अंधेरीच्या पश्चिमेकडील वीरा देसाई मार्गावर जीवन नगरमध्ये मोठ्या प्रमाणात दुधाची भेसळ करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट नऊच्या अधिकाऱ्यांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शेख, जाधव, उपनिरीक्षक कोरे यांच्या पथकाने अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह या ठिकाणी छापा घातला. अमूल ताजा, अमूल गोल्ड, गोकुळ क्रीम या कंपन्यांच्या दुधात भेसळ करताना नरसय्या थोडसू, रवी निम्मागौती, व्यंकय्या मुकमल्ला, साहिलकुमार थोडसू या चौघांना पकडण्यात आले. या टोळीमध्ये आणखी काही जणांचा समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भेसळ करणाऱ्या चौघांविरुद्ध अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीकडून विविध कंपन्यांच्या दुधाच्या १२८ रिकाम्या पिशव्या जप्त करण्यात आल्या असून या पिशव्या ते कुठून मिळवायचे, याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.