अंधेरी एमआयडीसी आगीत मृतांचा आकडा दहावर

0

7 जखमींची प्रकृती गंभीर, दोन जणांना अटक

मुंबई : अंधेरी एमआयडीसी येथील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 177 रुग्ण व नातेवाईक जखमी झाले असून जखमींपैकी 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, कामगार रुग्णालयातील आगी प्रकरणी दोन जणांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी सायंकाळी 3.30 वाजण्याच्या सुमारास अंधेरी एमआयडीसीतील कामगार रुग्णालयातील चौथ्या मजल्यावर भीषण आग लागली. या अग्नीतांडवात आतापर्यंत 10 जणांचा जीव गेला असून विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल जखमींपैकी 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, गुरुवारी दत्तू किसन नरवडे (65) याचा मृत्यू झाल्याचे होली स्पिरिट रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

दोन जणांना अटक

कामगार रुग्णालयातील आगप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीचा अभियंता नीलेश मेहता व सुपरवाईजर नितीन कांबळे या दोघांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. कंपनीच्या निष्काळजीपणीमुळे आग लागल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

…तरीही का दिला प्रवेश?

इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच रुग्णांना इमारतीमध्ये प्रवेश का दिला होता?, याबाबत अटक करण्यात आलेल्या त्या दोघांकडे सध्या चौकशी सुरू आहे. दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती परिमंडळ10चे पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. तसेच त्या दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.