अंधेरी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

0

मुंबई । अंधेरी परिसरातील 20 अनधिकृत बांधकामांवर पालिकेने हातोडा चालवला. या कारवाईत 19 व्यावसायिक व जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटरमधील वाहनतळाची जागा निष्कासित केल्याची माहिती ॠके-पश्‍चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली. ॠपरिमंडळ – 4’चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अंधेरी पश्‍चिम परिसरात असणार्या जुहू-वर्सोवा लिंक रोड व स्वामी विवेकानंद मार्ग यांना जोडणार्या ॠजेव्हीएलआर’ विस्तारीत मार्गावर अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती.

या बांधकामांमुळे 120 फूट रुंद असणार्या रस्त्याची रुंदी काही ठिकाणी 90 फूटापर्यंत कमी झाली होती. इन्फिनिटी मॉलजवळील परिसरात महापालिकेच्या भूखंडावर काही अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. या अनधिकृत बांधकामांबाबत महापालिका अधिनियम कलम 314 नुसार पालिकेने कारवाई केली होती. मात्र, न्यायालयाद्वारे याबाबत स्थगिती आदेश दिले होते. ही स्थगिती नुकतीच रद्द करण्यात आल्यानंतर पालिकेने कारवाई केली. येथील 19 व्यावसायिक स्वरुपाची अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली आहेत. यामुळे रस्त्याची रुंदी वाढण्यास मदत होणार असून वाहतूक व्यवस्थाही सुरळीत होणार आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.