अंध कंचनमालाला लागले हात पसरायला

0

बर्लिन ।  बर्लिनमधील पॅरा जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या पाच पॅरा जलतरणपटूंना हॉटेलचे बिल चुकवण्यासाठी दुसर्‍यांकडे हात पसरवायला लागल्याची घटना उघड झाली आहे.क्रीडा मंंत्रालयाने निधी मंजूर करुनसुद्धा पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया आणि शासकिय अधिकार्‍यांमध्ये समन्वय नसल्यामुळे नागपुरच्या कांचनमाला पांडे आणि इतर पाच पॅरा जलतरणपटूवर हा प्रसंग ओढावला. या मानहानीकारक घटनेचा या जलतरणपटूंच्या कामगिरीवर कुठला परिणाम झाला नसून कांचनमाला आणि सुयश जाधवने जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरत या स्पर्धेत भारताला रौप्यपदकांची कमाई करुन दिली. दरम्यान ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राने या पॅरा जलतरणपटूंवर ओढावलेल्या कठिण प्रसंगाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडा मंत्री विजय गोयल यांना ट्विटरद्वारे माहिती करुन दिली. बिंद्राच्या ट्विटला क्रीडा मंत्र्यानी लगेच प्रतिसाद दिला. गोयल म्हणाले की, पॅरॉऑलिम्पिक समितीला युवा आणि क्रीडा मंत्रालयाकडून निधी मंजूर करण्यात आला होता. पण नेमके काय घडले आहे याची माहिती घेत आहोत

युरोप दौरा हॉरर शो
भारताच्या पाच जलतरणपटूंसाठी हा युरोप दौरा एक हॉरर शो ठरतो आहे. बर्लिनमधील स्पर्धेआधी या संघाचे प्रशिक्षक गायब झाले आहेत. स्पर्धेचे प्रवेश शुल्क 7,462 रुपयेही या जलतरणपटूंनी स्वत:च्या खिशातून भरले. सध्या संघ जागतिक स्पर्धेसाठी लंडनमध्ये आहे. याठिकाणीही या जलतरणपटूंना पैशांची चणचण जाणवत आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने स्पर्धेसाठी फक्त 33.16 लाख रुपये दिले आहेत. प्रत्यक्शात मात्र आयोजकांनी या जलरणपटूंकडे 66.32 लाख रुपयांची मागणी केली आहे.

अंध आहे कांचनमाला
पॅरा जलतरणपटू कांचनमाला पांडे डोळ्यांनी बघू शकत नाही. असे असतानाही तिने जलतरणातील बहुतेक प्रकारांमध्ये कसब मिळवलेले आहे. भारत सरकारनेच तिला बर्लिन पॅरा जलतरण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाठवले होते. एस 11 गटात येणारी कांचनमाला फ्रि स्टाईल, बॅक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक या प्रकारांमध्ये माहिर आहे.