इनरव्हील निगडी प्राईडतर्फे ब्रेल रीडर भेट
पिंपरी-चिंचवड : इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने आळंदी येथील एनएफबीएम जागृती अंध मुलींच्या शाळेला ब्रेल रीडर कम प्रिंटर देण्यात आला. अनेक अडचणींचा सामना करत आयुष्याची परीक्षा देणार्या अंध विद्यार्थ्यांना ब्रेल रीडर कम प्रिंटरमुळे ब्रेल लिपीतील मजकुराचे प्रूफ रिडींग करता येणार आहे. प्रिंटर प्रदान कार्यक्रमावेळी इनरव्हील प्राईडच्या अध्यक्षा सविता राजापूरकर, संजूश्री मुनोत, सखीना बेदी, अंध शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. या प्रिंटरची किंमत एक लाख 80 हजार 600 रुपये असून हा प्रिंटर पूर्णतः विदेशी बनावटीचा आहे. अंकाजी पाटील, श्रीकृष्ण करकरे, सुहास ढमाले यांनी या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य केले. इनर व्हील क्लब ऑफ जेनेक्स यांनी देखील यासाठी सहकार्य केले.
अंध मुलांना देवनागरी लिपी वाचता येत नसल्यामुळे त्यांच्यासाठी अभ्यासक्रमातील व अन्य साहित्याचे ब्रेल लिपीमध्ये भाषांतर करावे लागते. ब्रेल रीडर कम प्रिंटरमुळे अंध विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीतील साहित्य वाचता येते. तसेच ब्रेल लिपीतील साहित्याचे ते प्रूफ रिडींग देखील करू शकतात. यामुळे जागृती अंध विद्यालयातील अंध विद्यार्थिनींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. शासनाचे यासंदर्भातील प्रकल्प देखील या विद्यार्थिनींना मिळतील.
-सविता राजापूरकर, अध्यक्षा