अंनिसचे ’जवाब दो’ आंदोलन

0

पुणे । डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला येत्या 20 ऑगस्ट रोजी 4 वर्षे पूर्ण होत असून मारेकर्‍यांना अटक करण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. याचाच जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) गुरुवारपासून ’जवाब दो’ आंदोलन सुरू केले आहे.

हे आंदोलन 20 ऑगस्टपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील अंनिसचे कार्यकर्ते त्या त्या भागातील आमदार व खासदाराच्या घरी जाऊन यासंदर्भात जाब विचारणार आहे. तसेच हा प्रश्न त्यांनी विधिमंडळात उपस्थित करावा, अशी मागणी करणार आहेत, अशी माहिती अंनिसच्या मुक्ता दाभोळकर यांनी दिली. डॉ. दाभोळकरांची हत्या ज्या ओंकारेश्वर पुलावर झाली. तेथे एकत्र येत अंनिसच्या कार्यकर्त्यांनी ही घोषणा केली.

मारेकर्‍यांची राज्यभर पोस्टर लावणार
डॉ. नरेंद्र दाभोळकर खूनप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या डॉ. विरेंद्र तावडे याच्याकडे केलेल्या चौकशीत सारंग अकोलकरसह अन्य एकाचे नाव पुढे आले आहे. परंतू त्यांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. त्यांना लवकरात लवकर पकडून शिक्षा द्यावी यासाठी हे आंदोलन करत असल्याचे मुक्ता यांनी सांगितले. याशिवाय डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणातील आरोपी विनय पवार व सारंग अकोलकर यांची 1 लाख पोस्टर तयार करून ती महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यात लावण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.