शहाद्यात सद्भावना रक्षाबंधन.
शहादा: शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांना एकत्र करीत सर्व धर्मीय विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सहभागाने सद्भावना रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला. हिंदू आणि मुस्लिम या सर्व विविध धर्मातल्या विद्यार्थ्यांनी परस्परांना राखी बांधून प्रेम, सौहार्द,रक्षण आणि परस्परांच्या स्वातंत्र्याचा सन्मान करण्याचा संकल्प केला.
महाराष्ट्र आणि सर सय्यद अहमद खान एज्युकेशन सोसायटी या दोघांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास शहरातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती.अंनिस चे जिल्हाध्यक्ष हैदर अली नुरानी, डॉ.शशांक कुलकर्णी, डॉ अलका कुलकर्णी, डॉ. बी डी पटेल, जयंट्स ग्रुपचे मानस चौधरी, राष्ट्रसेवा दलाचे राज्य मंडळ सदस्य कैलास भावसार, लोकशाही जागर मंचचे चुनीलाल ब्राह्मणे, पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील, डॉ अजहर पठाण, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, शाखा कार्याध्यक्ष संतोष महाजन यासह परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साने गुरुजींच्या” खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे “प्रार्थनेने सद्भावना रक्षाबंधन कार्यक्रमाची सुरुवात झाली. धार्मिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता, प्रेमाने आनंददायी सहजीवन जगण्याची भारतीय संस्कृती याबद्दल मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. त्याचप्रमाणे हा सण भाऊ बहीण यांच्या पवित्र नात्याला दृढ करणारा असल्याने, केवळ बहिणीने भावाला राखी न बांधता, भावानेही बहिणीला राखी बांधावी, आणि दोघांनीही परस्पर प्रेम, सदभाव, स्वातंत्र्य आणि आणि रक्षण याची जबाबदारी व कर्तव्य स्वीकारावे असे मान्यवरांनी आवाहन केले. सध्याच्या देशाच्या परिस्थितीत अशा कार्यक्रमांचे प्रचंड आवश्यकता असल्याचेही मान्यवरांनी आपल्या मनोगत सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर सय्यद विद्यालयाचे अध्यक्ष प्रा. लियाकत अली सय्यद होते.
या उपक्रमात शहादा शहरातील सर्व शाळांनी उत्तम प्रतिसाद दिला. यात न्यू म्युनिसिपल हायस्कूल, शेठ व्ही के शहा माध्यमिक विद्यालय, वसंतराव नाईक हायस्कूल, शारदा कन्या विद्यालय, व्हॅलेंटाईन माध्यमिक विद्यालय, सर सय्यद उर्दू हायस्कूल, निषाद माध्यमिक उर्दू शाळा, नॅशनल उर्दू हायस्कूल इत्यादी विद्यालयातील सुमारे पावणे दोनशे विद्यार्थी सहभागी होते. विद्यार्थी विद्यार्थिनींनी दोघांनीही परस्परांना राखी बांधून संभावना रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला. रक्षाबंधनाच्या दरम्यान सविता बोडरे यांनी रक्षाबंधनाचे गीत सादर करून वातावरण निर्मिती केली.
सूत्रसंचालन रऊफ अन्सारी यांनी केले, आभार भारती पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिसचे प्रवीण महिरे, घनश्याम सोनवणे, विनायक सावळे, विजय बोडरे, प्रदीप केदारे, संतोष महाजन,दीपक जगदाळे, सर सय्यद शाळेचे मुख्याध्यापक इफतिकार सय्यद, यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.