जळगाव। डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला 4 वर्ष पूर्ण झाले तरीही अद्यापही मारेकरी मोकाट आहेत. मारेकर्यांना अटक करावी या मागणीकरीता अंधश्रध्दा निर्मुलन समितीतर्फे शहरात जवाब दो आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी 18 रोजी बहिणाबाई उद्यानात निर्भय मोर्निंग वॉक रॅली काढण्यात आली. आंदोलनानंतर आमदार सुरेश भोळे यांना निवेदन देण्यात आले. डॉ.दाभोलकरांच्या हत्येला 20 ऑगस्टला 4 वर्षे होत आहेत. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्यासह कॉ.गोविंद पानसरे, एस.एम.कलबुर्गी यांची हत्या झाली. शासनासह तपास यंत्रणा तपासाबाबत गंभीर नाही म्हणून हे आंदोलन करण्यात आले. सरकारी तपास यंत्रणेने संशयित आरोपी निष्पन्न केले.
मात्र हे संशयित अद्यापही फरार आहेत. फरार संशयिताना अटक करण्यात तपासी यंत्रणा का अपयशी ठरल्यात?, अद्यापही आरोपी फरार का? त्यांना अटक न करण्यामागे काय कारणे आहेत? याची उत्तरे या आंदोलनातून अंनिसने मागितली.