अंबरनाथ : बारवी धरणाची उंची वाढवल्याने धरण क्षेत्रातील पाणलोट भागातील बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन त्वरित झाले नाही तर प्रकल्प रोखून धरण्याचा गंभीर इशारा सत्ताधारी भाजपा आमदार किसन कथोरे यांनी बुधवारी येथे दिला. धरणाच्या क्षमतेपेक्षा धरणात जादा पाण्याचा साठा केल्यास प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी आपण उभे राहणार असल्याचा इशारा देत असतानाच एमआयडीसीतील अधिकार्यांचा हलगर्जीपणा याला कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
अंबरनाथ शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या बारवी धरणाची उंची वाढवण्यात आल्याने धरणक्षेत्र परिसरातील तोंडली, काचकोळी, जांभुळवाडी, मोहघर, कोळेवडखळ, मानिवली आणि सुकाळवाळी या सात गावांमध्ये नागरिकांच्या घरात धरणाचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल झाले. या गावातील ग्रामस्थांनी आमदार कथोरे यांच्या नेतृत्वाखाली माजी उपसभापती राजभाऊ बांगर, भाजपाचे ग्रामीण तालुका अध्यक्ष राजेश पाटील यांनी बुधवारी अंबरनाथ येथील एमआयडीसी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. भर पावसात आलेल्या मोर्चात ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी आमदार किसन कथोरे यांनी प्रकल्प रोखण्याचा इशारा यावेळी दिला. एमआयडीसी कार्यालयावर प्रकल्पग्रस्तानचा मोर्चा येणार असल्याचे समजल्यावरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सहाय्यक पोलीस उपायुक्त सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
धरणग्रस्तांचे प्रश्न जैसे थे
ठाणे जिल्ह्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे बारवी धरण भरून वाहू लागले आहे. धरणाची उंची वाढवल्याने येथील सात गावातील नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. बहुतेकांच्या घरात आणि शेतामध्ये पाणी शिरल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून धरणग्रस्तांचा प्रश्न सुटू शकला नाही.
अजूनही न्याय मिळेना
धरणाची उंची वाढवण्यासाठी मागील वर्षी ग्रामस्थांची मने एमआयडीसीच्या अधिकार्यांनी वळवली. त्यामुळे धरणाची उंची वाढविण्यात आली. मात्र बाधित झालेल्या कुटूंबातील सदस्याला जिल्ह्यात महापालिका आणि नगरपालिका यामध्ये नोकरी देण्याचे ठरले होते, तसेच गावठाण विकास आणि अन्य मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर 10 ऑगस्ट 2016 रोजी चर्चा होऊन बाधितांच्या मागण्या त्वरित मान्य करून पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र अजूनही या मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.
धरणग्रस्तांचे पुनर्वसन, प्रत्येक कुटूंबाला नोकरी, गावठाण विकास आणि चांगल्या प्रकारे मोबदला यावर शिक्कामोर्तब झाले होते. धरणग्रस्तांचे पुनर्वसन करताना एक आदर्श मॉडेल तयार होईल असे पुनर्वसन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी झालेल्या बैठकीत दिले होते. मात्र आज पावेतो एक वर्ष पूर्ण होऊनही धरण क्षेत्रातील बाधीत झालेल्या लोकांच्या मागण्यांची एमआयडीसीमधील अधिकार्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे पूर्तता झाली नाही.
– किसन कथोरे, आमदार, भाजपा