अंबाजी शुगर ट्रेडिंगने घेतला बेलगंगा कारखान्याचा ताबा

0

चाळीसगाव । तालुक्यातील बेलगंगा सहकारी साखर कारखान्याचा लिलाव विक्रीत बोलीत अंबाजी ट्रेडिंग कंपनीला देण्याबाबत जिल्हा बँकेकडून शिक्कामोर्तब करण्यात आले होते. त्यानुसार अंबाजी शुगर ट्रेडिंगच्यावतीने जिल्हा बँकेकडे आत्तापर्यंत 40 कोटी रूपयांचा भरणा करण्यात आला आहे. त्यानंतर आज गुरूवार 18 जानेवारी रोजी अंबाजी शुगर ट्रेडिंग कंपनीचे सदस्यांसह बेलगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन चित्रसेन पाटील यांच्यासह काही कर्मचार्‍यांची उपस्थित प्रत्यक्षात बेलगंगा साखर कारखान्यात जावून ताबा घेतला आहे. यावेळी जिल्हा बँकेचे जनरल मॅनेजर एम.टी.चौधरी, शेती कर्ज खाते मॅनेजर श्री.सपकाळे आणि विभागिय उपव्यवस्थापक बी.ओ.पवार यांनी बँकेने लावलेले कुलूप काढून अंबाजी ट्रेडींग यांच्या ताब्यात देण्यात आले.

जिल्हा बँकेला आत्तापर्यंत 40 कोटीचा भरणा
टप्प्या टप्प्याने कर्मचार्‍यांचे पगारांसह इतर कर भरण्याची तयारी

जिल्हा बँकेचे 39 कोटी 22 लाख रूपये देणे बाकी असल्यामुळे अंबाजी शुगर ट्रेडिंग कंपनीच्या वतीने जिल्हा बँकेला आत्तापर्यंत 40 कोटी रूपयांचा भरणा करण्यात आला आहे. दरम्यान बेलगंगा साखर कारखान्याचे कर्मचार्‍यांनी आमचा उर्वरित पगार, जादा काम केल्याची रक्कम आणि भविष्य निर्वाह निधी (पीएफ)ची रक्कम त्वरीत मिळावी, अशी मागणी न्यायालयात केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसान जिल्हा बँकेने 40 कोटी मधूनच 11 कोटीची रक्कम कर्मचार्यांच्या पीएफच्या खात्यात अदा करण्यात आले आहे.

71 कोटी जिल्हा बँकेचे घेणे असल्याने काढला विक्री
चाळीसगाव तालुक्यातील बेलगंगा सहकारी साखर कारखाना सन 2002 पासून जिल्हा बँकेचे 71 कोटी घेणे असल्याकामी बँकेच्या ताब्यात होता. जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाने हा कारखाना विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्हा बँकेने केंद्र शासनाच्या एमएसटीसीई या एजन्सीमार्फत विक्री प्रक्रिया राबविली. या प्रक्रियेत चाळीसगाव येथील अंबाजी ट्रेडिंग कंपनीची एकमेव निविदा प्राप्त झाली होती. या निविदेपोटी 3 कोटी 92 लाखांची अनामत रक्कमही जमा करण्यात आली होती. एकमेव निविदा प्राप्त झाल्याने हा कारखाना त्यांना 39 कोटी 22 लाख रुपयांना विक्री करण्यात आला होता.