अंबाजोगाईत सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांच्या “शंभर नंबरी सोनं ” या कार्यक्रमाचे आयोजन

0

अंबाजोगाई : महाराष्ट्र शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभाग आणि मराठी भाषा विभाग तसेच भारतीय शिक्षण प्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पु.ल.देशपांडे, ग.दी.माडगुळकर व संगीतकार तथा गायक सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने 24 जानेवारी गुरूवार रोजी अंबाजोगाईत खोलेश्वर महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी 6 वाजता विठ्ठल उमप फाऊंडेशन प्रस्तुत सुप्रसिद्ध गायक नंदेश विठ्ठल उमप यांच्या “शंभर नंबरी सोनं” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे यांनी दिली आहे.

या संदर्भात माहिती देताना भाशिप्र संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण तथा सांस्कृतिक विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्या आग्रहास्तव सुप्रसिद्ध लेखक, नाट्य व सिनेअभिनेते पु.ल.देशपांडे, सुप्रसिद्ध कवी, पटकथा व संवाद लेखक आणि गीतकार ग.दी.माडगुळकर, सुप्रसिद्ध संगीतकार तथा गायक सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने राज्यात सर्वत्र विविध  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रशिक्षण,कार्यशाळा, सांस्कृतिक, भाषा संवर्धन आदी उपक्रमांचा त्यात समावेश आहे. याच अनुषंगाने विठ्ठल उमप फाऊंडेशन प्रस्तुत सुप्रसिद्ध गायक नंदेश विठ्ठल उमप यांच्या “शंभर नंबरी सोनं” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पु.ल.देशपांडे,ग.दी.मा. व सुधीर फडके उर्फ बाबुजी या तीनही दिग्गजांची गाणी, कलाविष्कार आणि नाट्यछटा आदींचा समावेश आहे. नंदेश उमप यांच्यासह त्यांचे 40 सहकारी कलाकार “शंभर नंबरी सोनं” या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

सदरील कार्यक्रमाची संपुर्ण तयारी व व्यवस्था खोलेश्वर संकुलना अंतर्गत सुरू आहे. यासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. अशी माहिती भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे, अध्यक्ष स्थानिक व्यवस्था मंडळ अ‍ॅड.किशोर गिरवलकर, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राम कुलकर्णी, खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांनी दिली आहे.