मुंबई । कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाबाई देवस्थानाबाबतीत स्थानिक लोकप्रतिनिधींशी पुढील पंधरा दिवसात बैठक घेण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.
सदस्य राजेश क्षीरसागर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. डॉ. पाटील म्हणाले, अंबाबाईला पारंपारिक वस्त्राऐवजी घागरा चोळीचा वेश परिधान करण्यात आल्याने भाविक, भक्तांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. यासंदर्भात २५ जुलै २०१७ रोजी याबाबतीत कायदा करण्यासाठी राज्य शासनाने समिती गठित केली. सहसचिव दर्जाचा अधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीची बैठकदेखील झाली आहे. पंढरपूर व शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर अंबाबाई मंदिरात देखील वारसा हक्काने पुजारी नेमण्याऐवजी शैक्षणिक अर्हता धारण करणारे पुजारी नेमण्याबाबत विचार सुरू आहे.
देवस्थानातील भ्रष्टाचाराबाबत सीआयडी चौकशी अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी सांगितले. भाविक भक्तांना धमकीचे पत्र आल्याबाबत त्या पत्रावर कारवाई करण्यात येईल. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य सर्वश्री हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, चंद्रदिप नरके, नितेश राणे यांनी सहभाग घेतला.