कोल्हापूर । करविरवासिनी श्री अंबामातेला घागरा-चोळीचा वेश परिधान करणार्या पुजार्यामुळे कोल्हापुरात मोठा वाद निर्माण झाला आहे. या मंदिराचे प्रसिध्दी देशभर असल्यामुळे हा वाद देशपातळीवर पोहोचला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या मंदिराचे पुजार्यांना कायमस्वरूपी हटवून त्यांच्या जागी पगारी पुजारी नेमावेत तसेच या मंदिरासंबंधी स्वतंत्र कायदा निर्माण करावा, अशी मागणी स्थानिक पातळीवर जोर धरू लागली आहे. यावर उद्या, गुरुवारी मंत्रालयात बैठक होणार आहे.
अंबाबाई देवस्थानसाठी स्वतंत्र अधिनियम करण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्यात यापूर्वीच पंढरपूर, शिर्डी, आणि सिद्धीविनायकसाठी स्वतंत्र अधिनियम आहे. सध्या कोल्हापूरमध्ये अंबाबाई भक्त मंडळानं पुजारी हटाव मोहिम सुरु केली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पगारी पुजारी नेमण्याबाबत एक समिती नेमली. या समितीने यापुर्वीच 2 हजार 500 पानांची कागदपत्र प्रशासनाकडे दिली आहेत. राज्याच्या महसूल विभागाच्या प्रधान सचिवांच्या दालनात उद्या दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे. त्यामुळे आता या बैठकीमध्ये काय निर्णय होतो याकडे देवीच्या भक्तांसह कोल्हापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हा परिषदेतील ठरावाचा होणार परिणाम
इंगवले यांनी अंबाबाईदेवीला घागरा-चोळीचा वेश परिधान करून पूजा बांधणे हे भक्तांच्या भावनांशी खेळणारे वर्तन आहे. असा प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी जिल्हाधिकार्यांनीच आचारसंहिता घालून देणे आवश्यक आहे. यानिमित्ताने पुजार्यांचा प्रश्न पुढे आला आहे. पंढरपूरच्या धर्तीवर कोल्हापुरातही अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमावेत, असा ठराव नुकताच जिल्हा परिषदेत मंजून झाला.त्यामुळे मंदिरातील पुजार्यांकडूनच भाविकांना लुबाडणे, भक्तांसोबत वाद घालणे या बेकायदा गोष्टींच्या विरोधात कोल्हापुरात एकवटलेले जनमत उद्या मंत्रालयात प्रधानसचिवांच्या बैठकीत या समस्यांवर उहापोह करणार आहे.