पुणे । अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा गोंधळ ऊडू नये म्हणून यावर्षी एक लाख माहितीपुस्तिकांची छपाई केली आहे. या पुस्तिका शाळांमध्ये पुढील आठवड्यापासून उपलब्द करून दिल्या जाणार आहेत अशी माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या सचिव मिनाक्षी राऊत यांनी दिली. येत्या दोन ते तीन दिवसांतच महाविद्यालयांची या वर्षीची नोंदणीही सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अकरावी प्रवेशासाठी आपल्याला कोणते महाविद्यालय हवे आहे हे विद्यार्थ्यांनी आधीच ठरवून ठेवले असले तरीही प्रत्यक्षात जेव्हा प्रवेश सुरू होतील तेव्हाच त्यांना कट ऑफ’ कळेल. मात्र, अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रवेशाची तयारी एप्रिलपासूनच सुरू केली आहे. दहावीचा निकाल साधारण जून महिन्यात लागतो, त्यानंतर लगेचच प्रत्यक्ष प्रवेशाला सुरुवात होते. मात्र, त्याआधी प्रवेशाची पूर्वतयारी म्हणून माहितीपुस्तिकांचे वाटप केले जाते; तसेच मुलांकडून अर्जाचा भाग एकही भरून घेतला जातो.
अकरावी प्रवेशाची तयारी आम्ही केली असून 1 लाख माहिती पुस्तिकांची छपाई केली आहे. पुढील सोमवारपासून विद्यार्थ्यांना शाळांमध्ये या माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिल्या जातील. जेणेकरून विद्यार्थी प्रवेशाविषयीची सर्व माहिती जाणून घेऊ शकेल.
– मिनाक्षी राऊत, सचिव,
अकरावी केंद्रीय प्रवेश समिती