जळगाव । दहावी परीक्षेचा निकालानंतर लगबग सुरु झाली. अकरावी प्रवेश प्रकियेला मंगळवारी 27 पासून सुरवात झाली आहे. प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी शहरातील महाविद्यालयांमध्ये गर्दी केली. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात ऑफलाईन अर्ज भरून जमा केले. गुणवत्तायादी जाहीर करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. पहिली यादी 3 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 24 ते 29 पर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. गुणपत्रकाचे वितरण करण्यात आले आहे. शहरातील मु.जे.महाविद्यालय, नुतन मराठा महाविद्यालय, डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, अॅड. बबनभाऊ बाहेती महाविद्यालय, धनाजी नाना चौधरी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी प्रवेशासाठी लगबग दिसून आली.
वाणिज्य व कला शाखेसाठी थेट प्रवेश
विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल असल्याने शहरातील सर्व महाविद्यालयांमध्ये गर्दी केली होती. मूळजी जेठा महाविद्यालयात विज्ञान व वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी 3 रोजी पहिला गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. मू.जे महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या 1080 जागा, वाणिज्य शाखेच्या 600 तर कला शाखेच्या 120 जागा आहे. नुतन मराठा महाविद्यालयात देखील विज्ञान शाखेत प्रवेश घेवू इच्छिणार्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वाणिज्य व कला शाखेसाठी विद्यार्थ्यांना थेट प्रवेश दिले जाणार आहे.
अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयात प्रवेश
धनाजी नाना महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या 240 जागा असल्याने विद्यार्थ्यांचा महाविद्यालयांकडे अधिक कल दिसून येत आहे. त्यांचबरोबर अण्णासाहेब डॉ. जी.डी बेंडाळे महाविद्यालयात देखील विद्यार्थींनी पहिल्याच दिवशी प्रवेशासाठी गर्दी केली होती. बेंडाळे महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या 220 जागा आहे. शहरातील महाविद्यालयांमध्ये 4 हजार 800 जागा ह्या अनुदानित तर 2 हजार 650 जागा हया विनाअनुदानित असून यंदा सर्वच महाविद्यालयांमध्ये मुबलक प्रमाणात प्रवेशाच्या जागा आहे.