फेर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश
पुणे । अद्याप प्रवेश न मिळालेल्या व दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशाची विशेष फेरी शनिवारपासून (2 सप्टेंबर) राबविण्यात येणार आहे. शेवटच्या फेरीत साधारणत: 100 विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांना विशेष फेरीमुळे महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या वतीने पुणे व पिंपरी-चिंचवडमधील महाविद्यालयांच्या अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविली जात आहे. आतापर्यंत प्रवेशासाठी 4 फेर्या, 1 विशेष फेरी व प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य अशा एकूण 6 फेर्या राबविण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी 4 ते 7 सप्टेंबर 2017 दरम्यान अर्ज भरायचे आहेत. त्यानंतर 8 सप्टेंबर रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्याचबरोबर राज्य मंडळाकडून जुलै-ऑगस्ट 2017 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. 29 ऑगस्ट) जाहीर करण्यात आला. या परीक्षेत पुणे जिल्ह्यातून अडीच हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, शिल्लक असलेल्या जागांची संख्या 15 हजार इतकी आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यास मदत होणार आहे.