पुणे । अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत यंदा पहिल्यांदाच राबविण्यात येत असलेल्या ‘प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य’ तत्वानुसार तिसर्या गटातील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कॉलेजांमध्ये प्रवेश घेता येणार असल्याची माहिती प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत यांनी दिली आहे.
केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कॉलेजांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. प्रवेशाच्या चार नियमित व एक विशेष फेरी झाली आहे. मात्र, अद्यापही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांबरोबरच प्रवेश मिळून काही कारणांमुळे प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य ही फेरी राबविण्यात येत आहे. तिसर्या गटातील 35 ते 100 टक्के गुण असणार्या गटातील विद्यार्थ्यांना मंगळवारी प्रवेश घेता येणार आहे. दरम्यान, तिसर्या गटात सोमवारी सायंकाळपर्यत 1 हजार 32 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील ही शेवटची फेरी असून आता दुसरी विशेष फेरी दहावी फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी, एटीकेटी तसेच अद्याप कोठेही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे. या फेरीचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देखील राऊत यांनी दिली आहे