अकरावी सायन्सच्या 76 विद्यार्थ्यांची परीक्षा खासगी ट्युशनमध्ये!

0

मुंबई । शिक्षणाच्या बाजारीकरणाचा धक्कादायक प्रकार चारकोपमध्ये सोमवारी उघडकीस आला आहे. ज्यात बोरिवलीच्या एका महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकणार्‍या जवळपास 76 विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा ही चारकोपच्या एका खासगी ट्युशनमध्ये घेण्यात आली. जो पेपर कॉलेजमध्ये सोडविणे अपेक्षित होते तो या मुलांनी ट्युशनमध्ये सोडविला. याप्रकारामुळे शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली असुन कॉलेज प्रिन्सिपलसह ट्युशन चालकाच्या मुसक्या चारकोप पोलिसांनी आवळल्या आहेत.

‘राम पंडागळे एज्युकेशन ट्रस्ट’ च्या कॉलेडमधिल घटना
बोरिवली पश्‍चिमच्या देविदास लेनमध्ये ‘राम पंडागळे एज्युकेशन ट्रस्ट’ आहे. या कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात हे 76 विद्यार्थी शिकतात. तर चारकोपच्या ‘मकरंद गोडस क्लासेस’ मध्ये ही मुले खासगी ट्युशनसाठी जातात. ज्यासाठी त्यांच्याकडून या ट्युशनचा चालक मकरंद गोडस (46) याने फी स्वरूपात मोठे पॅकेज आकारले आहे. बोरिवलीच्या कॉलेजचा प्राध्यापक प्रशांत अरविंद गायकवाड याने काही दिवसांपुर्वी चारकोप पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. ज्यात महाविद्यालयातील विज्ञान विषयाची परीक्षा ही गोडस याच्या खासगी ट्युशनमध्ये घेण्यात आल्याचे त्यांने सांगितले. फेब्रुवारी, 2017 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरु केली. ज्यात गेल्या वर्षभरापासून गायकवाडला याबाबत सर्वकाही माहित होते असे समोर आले. त्यानुसार सोमवारी रात्री गोडस आणि गायकवाड या दोघांनाही पोलिसांनी अटक केल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. गायकवाड यात सामील होता तरी त्याने गोडसे विरोधात तक्रार का केली याचाही गुंता सध्या पोलीस सोडवत आहेत. मात्र या प्रकारामुळे महाविद्यालय आणि खासगी ट्युशनच्या साटेलोट्यात शिक्षणाची काळाबाजारी पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. ज्यामुळे विद्यार्थी आणि पालक अस्वस्थ झाले आहेत.

इतर शिक्षकांचा समावेश?
‘आम्ही या दोघांना अटक करून त्यांची चौकशी करत आहोत. याप्रकरणी कॉलेजच्या अन्य शिक्षकांचा सहभाग असल्याचा संशय आम्हाला आहे. तसेच विज्ञान व्यतिरिक्त अन्य कोणत्या विषयाचे पेपर अशा प्रकारे उपलब्ध करविण्यात आलेत का, याचीही चौकशी तपास अधिकारी करत आहेत’, असे याबाबत सांगण्यात आले.