अकराव्या जलसाहित्य संमेलनास धुळ्यात प्रारंभ

0

धुळे । देशबंधू व मंजू गुप्ता फाउंडेशन, भारतीय जल संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अकराव्या जलसाहित्य संमेलनाला धुळे देवपूर परिसरातील नकाणेरोडवरील वेदांत मंगल कार्यालयात शनिवारी सकाळी उत्सहात सुरुवात झाली. शहरातील जयहिंद हायस्कूलपासून जलदिंडी काढण्यात आली. या जलदिंडीत जिल्ह्यातील नद्यांचे पाणी एका कलशात संकलित करून त्या कलशाची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी ’पाणी हेच जीवन’, ’पाण्याचा वापर जपून करावा’ असा संदेश दिला. यावेळी स्वागताध्यक्ष रावसाहेब बढे, जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव भामरे, संमेलन समितीचे सचिव डॉ. संजय पाटील, संजय झेंडे आदी उपस्थित होते. शहरातील जयहिंद हायस्कूलपासून जलदिंडीला सुरुवात झाली. पुढे ही दिंडी इंदिरा गार्डन, प्रमोद नगर येथील स्टेट बॅँक ऑफ इंडिया, तुळशीराम नगर, नकाणेरोडमार्गे संमेलनस्थळी आली.

जलसाक्षरता प्रदर्शनातून जनजागृती
जलदिंडीच्या मिरवणुकीची सांगता वेदांत मंगल कार्यालयात झाली. त्यानंतर मंगल कार्यालयात उभारण्यात आलेल्या देशबंधू गुप्ता नगरी येथे मुकुंद धाराशिवकर विचारमंच येथे संमेलनाचे उदघाटन झाले. यावेळी अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ तथा संमेलनाचे अध्यक्ष डॉ. माधवराव चितळे, महाराष्ट्र सिंचन सहयोग संस्थेचे अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे, भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव भामरे, दत्ता देशकर, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, जितेंद्र तलवारे, डॉ. संजय पाटील, जलतज्ज्ञ डॉ. धनंजय नेवाडकर आदी उपस्थित होते. संमेलनाच्यानिमित्ताने मंगल कार्यालयाच्या प्रांगणात जलसाक्षरता प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनातून उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.