मुंबई । भारताची महिला अंतरराष्ट्रीय मास्टर अकांक्षा हगवणे (एलो 2297) हिने दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत बेल्जियमची अंतरराष्ट्रीय मास्टर अॅना झोझुलिया हिला एसबीअय लाइफ-एआयसीएफ महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत बरोबरीत रोखण्याची करामत केली. इंडियन चेस स्कूल अणि साऊथ मुंबई चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ऑल इंडिया चेस फेडरेशनच्या (एआयसीएफ) मान्यतेने चेंबूर येथील द एकर्स क्लबवर भारत अणि परदेशातील 12 अव्वल बुद्धिबळपटूंमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत चार सामने निकाली निघाले तर दोन लढती बरोबरीत सुटल्या. तिसर्या पटावर, भारताच्या अकांक्षा हगवणे हिने अपल्यापेक्षा वरचढ असलेल्या बेल्जियमच्या अॅनाविरुद्ध सुरेख चाली रचत प्रतिस्पर्धीवर दडपण आणले होते. अखेर 40व्या चालीनंतर दोघींनीही बरोबरी पत्करण्याचे मान्य केले.
पहिल्या पटावर, उझबेकिस्तानची महिला ग्रँडमास्टर गुलरुखबेगिम तोखीरजोनोव्हा (एलो 2379) हिने रशियाच्या महिला अंतरराष्ट्रीय मास्टर एलेना तोमिलोव्हा (एलो 2334) हिच्याविरुद्ध बरोबरी पत्करली. त्यामुळे दोघींनाही अर्ध्या गुणावर समाधान मानावे लागले. व्हिएतनामची महिला ग्रँडमास्टर थि किम फुंग वो (एलो 2376), कझाकस्तानची महिला ग्रँडमास्टर गुलिश्कन नाखबायेव्हा (एलो 2323) अणि विजेतेपदासाठीची प्रबळ दावेदार समजली जाणारी मोंगोलियाची अंतरराष्ट्रीय मास्टर बाखुयाग मुंगूनटुल (एलो 2410) यांनी अपल्या पहिल्या फेरीच्या लढतीत विजय मिळविताना भारताच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. थि किम फुंग वो हिने दिव्या देशमुख (एलो 2138) हिला पराभूत केले. गुलिश्कन हिने महिला अंतरराष्ट्रीय मास्टर जी.के. (एलो 2295) हिच्यावर मात केली. बाखुयाग हिने महिला अंतरराष्ट्रीय मास्टर श्रीजा शेषाद्री (एलो 2207) हिच्यावर सहज विजय मिळवला.