विद्यार्थी सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम
ठाणे । अध्ययन अक्षम या विषयाबद्दल समाजात फारशी जागरूकता नसल्याने मागील अनेक पिढ्याचे शैक्षणिक नुकसान झाले. हा आजार नसून ही एक स्वाभाविक स्थिती आहे. त्यामुळे मुल शिक्षणात मागे पडत असेल तर पालकांनी आणि शिक्षकांनी मुलाबद्दल जागरूक व्हायला हवे. जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या उपक्रमातून हे विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होणार असल्याचा आशावाद जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी व्यक्त केला. ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून अध्ययन अक्षम विद्यार्थी मुलभूत शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी राबवण्यात येणार्या ‘अध्ययन अक्षम विद्यार्थाना समजून घेताना’ या महत्वाकांक्षी उपक्रमातील विशेष शिक्षकांच्या दोन दिवशीय प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हे शिबीर सुरु राहणार आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील, शिक्षणाधिकारी मीना यादव उपस्थित होते.
उपक्रमात आयपीएच संस्थेचे सहकार्य
यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार म्हणाले, गेल्याच वर्षी दिव्यांग कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि त्यामध्ये अध्ययन अक्षम विद्यार्थांचाही समावेश करण्यात आल्याने समाजात बदल घडेल अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर या विषयी सहकार्यांशी चर्चा केल्यानंतर अध्ययन अक्षम विद्यार्थासाठी ठोस उपक्रमाची तीव्र गरज लक्षात आली. आणि म्हणून या उपक्रमात आयपीएच संस्था उत्तम सहकार्य करत असून अध्ययन अक्षम विद्यार्थाना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने राज्यात अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम हाती घेतला असल्याचेही भीमनवार यांनी सांगितले.
यावेळी शिक्षणाधिकारी मीना यादव यांनी उपस्थित सर्व विशेष शिक्षकांना हा उपक्रम राबवण्या मागचा उद्देश स्पष्ट केला. माणूस म्हणून जगताना सर्वाना समान संधी असावी, जन्माला येणार्या प्रत्येकाला शिकता यावे, कोणत्याही विद्यार्थांच्या मनात शिकण्याबद्दल न्यूनगंड नसावा ही बाब लक्षात घेऊन सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची ही धडपत असल्याची यादव यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमाचे समन्वयक अनिल कुर्हाडे यांनी केले.