अकोला : सारे अकोला शहर गुरुवारी ‘गण गणात बोते’च्या गजरात न्हावून निघाले. निमित्त होते गजानन महाराजांच्या पालखीचे अकोला शहरात झालेल्या आगमने. बुधवारी रात्री भौरद गावात मुक्काम केल्यानंतर गुरुवार सकाळी डाबकी रोडमार्गे श्रींच्या पालखीचे अकोल्यात आगमन झाले आहे. अकोलेकरांनी मोठ्या उत्साह आणि भक्तिभावाने महाराजांच्या पालखीचे स्वागत केले. गजानन महाराजांची पालखी गुरुवारीअकोल्यात मुक्काम केला. शनिवारी पालखी अकोल्यावरून पुढच्या प्रवासाला निघणार आहे. 31 मेला शेगावातून निघालेली गजानन महाराजांच्या पालखीचे नागझरी, पारस आणि भौरदमार्गे अकोल्यात आगमन झाले होते.
तरुणांचा सहभाग लक्षणीय
शहरातील डाबकी रोडवर गजानन महाराज स्वागत समितीच्यावतीने महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले होते. गजानन महाराजांच्या पालखीचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. विशेष म्हणजे दरवर्षी सारखाच यावर्षीही वारीमध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. विठू नामाचा जयघोष करत 31 मे रोजी गजानन महाराजांची पालखी शेगावहून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली.
या पालखीमध्ये तीनशे टाळकरी, 250 पताकाधारी, 150 सेवाधारी, गायक वादक, अश्व, हत्ती सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे विठूरायांच्या भेटीसाठी सगळ्यात आधी निघणारी ही पालखी आहे. या पालखीचा प्रवास तब्बल दोन महिने चालतो. पालखीमध्ये साधारण 600 ते 650 वारकरी दाखल झाले आहेत.