अकोल्याच्या सुपुत्राला वीरमरण

0

श्रीनगर : काश्मीरमधील शोपियान येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत अकोल्यातील जवान सुमेध गवई हे शहीद झाले. गवई यांच्यासह इलय्याराजा पी. हा जवानही चकमकीत शहीद झाला असून चार जवान जखमी झाले. ही चकमक उशीरापर्यंत सुरू होती. लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. शहीद गवई हे अकोला जिल्ह्यातील लोणाग्रा गावचे सुपुत्र होते. तेथे त्यांचे आई-वडील, बहीण राहतात. ते चार वर्षांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले होते.

पोलिसांच्या गस्तीपथकावर हल्ला
शूपियान येथे रविवारी लष्कराने चकमकीत प्रथम एका दहशतवाद्यास कंठस्नान घातले. यावेळी झालेल्या चकमकीत 2 जवान शहीद झाले. तर 3 जण जखमी झाले. बांदीपोरा सेक्टरमध्ये 2 ते 3 दहशतवादी दडून बसल्याची माहिती मिळाल्याने लष्कराने शोधमोहिम सुरू केली. लष्कराने या संपूर्ण परिसराला वेढा घातला. तत्पुर्वी, बांदीपोरा पोलिसांच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता यात 2 पोलिस जखमी झाले होते.

5 जवान, 7 गावकरी जखमी
आयजी मुनीर खान यांनी सांगितले की, शूपियान येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस, सीआरपीएफ आणि 55 नॅशनल रायफल्सने संयुक्त कारवाई केली. सुरक्षा दलांवर लपून बसलेल्या 2 दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात 5 जवान जखमी झाले. जखमी जवानांवर उपचार सुरु असताना 2 जवानांचा मृत्यू झाला. स्थानिक गावकर्‍यांनीही लष्करावर दगडफेक केली. यावेळी पेलेट गनचा वापर करण्यात आला. त्यात 7 गावकरी जखमी झाले. जखमी भारतीय जवानांमध्ये एका कॅप्टनचा समावेश आहे. वीरमरण आलेले महाराष्ट्राचे सुपुत्र सुमेध गवई यांचे लहान भाऊही लष्करात असून त्यांचे सध्या ट्रेनिंग सुरू आहे.