अकोल्यातील छोट्या सरदारजीची सारंगखेडा यात्रेसाठी घोडेसवारी

0

आज अमळनेरात आगमन ; छंद जोपासत प्राणी मात्रांबाबत जागृती करण्याचा प्रयत्न

अमळनेर- विदर्भातील अकोला येथून घोडेसवारी करत सारंगखेडा यात्रेसाठी निघालेला 10 वर्षीय छोटा सरदारजी उर्फ राजवीर कालरा याचे बुधवार, 19 रोजी सायंकाळी 5.30 वा अमळनेर शहरात आगमन होणार आहे. अमळनेर येथे एक दिवस रात्रीचा मुक्काम करून 20 रोजी तो सारंगखेड्याकडे रवाना होणार आहे.घोडे स्वारीचा छंद जोपासत प्राणी मात्रांबाबत जनजागृती करण्यासाठी तो हा दौरा करीत आहे. अमळनेर येथे आज 5.30 वाजता विश्राम गृहाजवळील महाराणा प्रताप चौकात त्याचे आगमन झाल्यानंतर तेथे राणा प्रतापांच्या प्रतिमेचे पूजनानंतर नाट्यगृहातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून खा.शि मंडळाचे माजी अध्यक्ष गुलविरसिंग कालरा यांच्या मुंबई गल्ली जवळील निवासस्थानी तो येणार आहे व याच ठिकाणी त्याचा रात्रीचा मुक्काम असणार आहे. राजविर हा अकोला येथील उद्योजक सिमरंजीत कालरा यांचा सुपुत्र असून बालपणापासून तो घोडेस्वारी करीत असल्याने कमी वयात निष्णात घोडेस्वार म्हणून तो सुपरिचित आहे.वयाच्या तिसर्‍या वर्षांपासून त्याने या घोड्याशी मैत्री जोपासून अनेकदा लांबचा प्रवास केला आहे,प्राण्यांबाबत अधिक जनजागृती होऊन सोबत वाहन मुक्तीचा संदेश देण्यासाठी घोड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा यात्रेस घोडेस्वारी करत जाण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. वडिलांनी त्यास प्रोत्साहन दिल्याने 15 डिसेंबर पासून त्याने प्रवासाला सुरुवात केली आहे. सारंगखेड्यापर्यंत सुमारे 345 किलोमीटरचा प्रवास तो करणार आहे. दररोज 55 किमी अंतर तो गाठत असून तो 22 डिसेंबर रोजी थेट सारंगखेडा पोहोचून श्री दत्त प्रभूंचे दर्शन घेणार आहे. त्या ठिकाणी चेतक फेस्टिव्हलचे अध्यक्ष जयपालसिंग रावल हे त्याचे स्वागत करणार आहेत. राजविरच्या या प्रवासात त्याच्या सोबत वडील सीमरंजित कालरा, पशु चिकित्सक व एक नालमॅनसह पाच लोकांचे पथक आहे. या धाडसी राजविर ला प्रोत्साहन व शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी उपस्थिती द्याव, असे आवाहन गुलविरसिंग कालरा यांनी केले आहे.