शहर वाहतूक शाखेची कारवाईः रिक्षासह तीन जण ताब्यात
जळगाव: एरंडोल येथून जळगावकडे येत असलेल्या शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक यांच्यासह कर्मचार्यांनी रिक्षातून वाहतूक होत असलेल्या 60 हजार रुपये किमतीचा अवैध दारुच्या साठा पकडला आहे. दादावाडी जवळ शहर वाहतूक शाखेने दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. कारवाई करुन रिक्षा, मुद्देमालासह तीन जणांना ताब्यात घेण्यात आले तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
रिक्षातून जात असलेल्या दारुच्या गोण्या धरणगाव रेल्वे स्थानकावर पोहचवूून तेथून रेल्वेने अकोला येथे पोहचविण्यात येत होत्या. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमिवर शहरात बंदोबस्त तैनात असल्याने संशयितांनी धरणगाव स्थानकाहून माल अकोला येथे पोहचविण्याची शक्कल लढविल्याचेही समोर आले आहे.
पोलिसांना पाहताच रिक्षा गल्लोगली पळविली
पोलीस निरिक्षक देविदास कुनगर कर्मचार्यांसह जळगावकडे येत होते. यादरम्यान दादावाडीजवळ रिक्षात (क्रमांक एमएच 19 सी डब्ल्यू 2854) तीन ते चार जण बसलेले तर गोण्या दिसल्या. पोलिसांनी गाडी थांबविण्याच्या सुचना करताच, चालकाने गल्लोगल्ली रिक्षा पळविली. वाहतूक शाखेने पाठलाग करुन रिक्षा पकडली. तपासणी केली असता, यात टँगो पंचच्या 2 हजार बाटल्या 20 गोण्यांमध्ये बांधून घेवून जात असल्याचे दिसून आले.
तालुका पोलिसांच्या दिले ताब्यात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर, जीतू पाटील, योगेश पाटील, दीपक महाजन, संजय नाईक यांच्यासह कर्मचार्यांनी ही कारवाई केली. कारवाईत पोलिसांनी या 60 हजारांचे 2 हजार टँगो पंचच्या दारूच्या बाटल्या, रिक्षा या मुद्देमालासह रिक्षाचालक विनोद श्रावण शेजवळ रा. जळगाव, अलका राहुल भाट (35), प्रितेश श्रावण बागडे (20) आणि रितेल राम मालतेक (18) सर्व रा. कंजरवाडा, सिंधी कॉलनी परिसर यांना ताब्यात घेतले आहे. सदरची दारु ही जळगावहून धरणगाव व तेथून अकोला येथे घेवून जात असल्याचे संशयितांना चौकशीत पोलिसांना सांगितले. पुढील कारवाईसाठी सर्वांना तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.