अक्कलकुवात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
शीख गल्लीच्या रस्त्यावर तात्काळ स्वच्छता करण्याची मागणी
खापर। ‘स्वच्छ भारत…स्वच्छ शहर’ चा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडून आवाहन करण्यात येऊन शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. मात्र, अक्कलकुवा शहराची तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे वाटचाल होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकीकडे कोरोनाची धास्ती आणि शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता पसरल्यामुळे भविष्यात कोरोनाच्या फैलावाला रोखता रोखता दुसर्याच आजाराने तोंडवर काढल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधूनच उपस्थित होत आहे. आधीच कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहे तर आता जिल्ह्यामध्ये डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे घाणीमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे अक्कलकुवा शहरातील शीख गल्लीच्या रस्त्यावर तात्काळ स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड.रुपसिंग वसावे यांनी केली आहे.
अक्कलकुवा शहरात स्वच्छतेसाठी निधी मिळतो. मात्र, तो निधी खरोखरच स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो. हे शहरातील अस्वच्छतेवरून स्पष्ट होते. शहरातील अनेक भागातील नाल्या घाणीने तुडूंब भरलेल्या आहेत. ते घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. काही ठिकाणी कचरा हा अस्ताव्यस्त पसरून रोगाला आमंत्रण देण्याचे काम करीत आहे. शहर स्वच्छतेवर भर असल्याची ओरड स्थानिक प्रशासनाकडून केली जात असली तरी शहरात अनेक ठिकाणी असलेली घाण व कचरा हे स्वच्छतेबाबत किती जागृत आहे हे दाखवून देते.
ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असल्याची तक्रार
देशपातळीपासून ते गावपातळीपर्यंत स्वच्छतेकरिता प्रत्येक गावाकरिता लाखो, करोडो रुपयांचा निधी वितरीत केल्या जातो. तो निधी नागरिकांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने केला जातो. मात्र, त्या निधीची विल्हेवाट स्वच्छतेच्याच दृष्टीने करणे हे काम स्थानिक प्रशासनाचे असते. त्या निधीतून शहर स्वच्छतेवर भर देणे हे कामही तेवढेच महत्त्वाचे असते. याकडे ग्रामपंचायत प्रशासन मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार ग्रामस्थांंनी केली आहे.
सांडपाणी रस्त्यावर तुंबल्याने सर्वदूर गटारी साचल्या
अक्कलकुवा ग्रामपंचायत असलेल्या या गावामध्ये मूलभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. ह्या सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत आहे. गावांमध्ये बहुतांश रस्त्यांचे बांधकाम झालेले नसल्याने गटार बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे गावातील संपूर्ण सांडपाणी रस्त्यावर सोडले जात आहे. काही नागरिकांनी सांडपाण्यासाठी असलेले शोषखड्डेही बुजवून घेतल्याने हे संपूर्ण सांडपाणी रस्त्यावर तुंबल्याने सर्वदूर गटारी साचल्या असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. सोबतच दुर्गंधीमुळे नागरिक बेजार झाले असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.