अक्कलकुवा तालुक्यातील खुनाचा उलगडा : दोघा आरोपींना गोपनीय माहितीवरून अटक

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील हुनाखांबचा चेनवाईपाडा येथील नऊ वर्षीय बालिकेच्या खुनाचा उलगडा झाला असून या प्रकरणी रवी दिल्या वसावे व मंगेश गुलब्या वसावे 21 या दोघांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याने ही बाब ती घरी सांगेल, या भीतीने तिचा दगडाने ठेचून खून करीत झाडाच्या पाल्यात झाकून ठेवल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले.

गोपनीय माहितीवरून आरोपींना बेड्या
17 मार्च रोजी 9 वर्षाची बालिका बेपत्ता झाली. 19 मार्च रोजी 9 वर्षाची मुलगी महच्या झाडाच्या पानाखाली अर्ध नग्नावस्थेत मृतावस्थेत दिसली व तिने घातलेल्या फ्रॉकने तिचे तोंड झाकलेले होते. उदेसिंग वसावे यांनी तोंडावरील फ्रॉक वाजूला करून पाहिले असता तिचे नाका-तोंडातून रक्तस्त्राव होत होता व तिचे कपाळावर, डोळ्यावर व ओठावर गंभीर जखमा झालेल्या दिसत होत्या. चमकवाई उदेसिंग वसावे यांच्या फिर्यादीवरून मोलगी पोलिस ठाणे येथे अज्ञात आरोपीताविरुद्ध खून करून पुरावा नष्ट केल्याबाबत गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी दोघा संशयितांना अटक झाली. पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधीकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर आदींनी ही कामगिरी केली.